Maharashtra election 2019 :'चंपा' शब्द माझा नाही तर भाजपच्या मंत्र्याचा ; नाव निवडणुकीनंतर सांगेन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 10:51 AM2019-10-19T10:51:11+5:302019-10-19T11:11:59+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मी वापरलेला 'चंपा' हा शब्द माझा नसून भाजपच्याच एका कॅबिनेट मंत्र्यांचा आहे असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मी वापरलेला 'चंपा' हा शब्द माझा नसून भाजपच्याच एका कॅबिनेट मंत्र्यांचा आहे असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.
पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, 'चंपा' हा शब्द माझा नाही. मी एका भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याकडे गेलो होतो. त्यांनी त्यावेळी बोलताना चंपा माझं ऐकतील असं वाटतं नाही असं वाक्य वापरलं.त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे ही मी चंद्रकांतदादांना भेटून सांगेन. मात्र आम्ही नाही तर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मंत्री असं म्हणतात, हा आमचा शब्द नाही.
अजित पवार यांनी पिंपरी येथील सभेत चंपा शब्द वापरल्यावर राज ठाकरे यांनीही पुण्यात वापरला होता. त्यावरून पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या सभेत प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे हा वाद वाढलेला दिसून आला. आता मात्र पवार यांनी काहीशी मवाळ भूमिका घेत भाजपच्याच मंत्र्याकडे बोट दाखवले आहे.
यावेळी पवार यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- भाजपने कितीही आव आणला तरी नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजप आहे, नितीन गडकरीही फारसे प्रचारात दिसले नाहीत.
- मी निवनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजीनामा दिला नाही, मी नौटंकी करणारा नेता नाही, वेळ बघून काहीही करत नाही.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा अभिमान
- अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु असल्यामुळे प्रचारावर परिणाम
- तिकीट वाटपात उशीर झाल्याने काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्रित सभा होऊ शकली नाही.
- पंतप्रधान प्रचारासाठी आल्यामुळे आम्हाला आमच्या सभा रद्द कराव्या लागल्या, हेलिकॉप्टर उडू दिले नाही.