पुणे : मतदानाची सुट्टी म्हंटलं की अनेकजण एखाद्या सहलीचा किंवा सिनेमाला जाण्याचा बेत आखतात. निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी अनेकदा 40 ते 50 टक्क्यांच्या दरम्यानच असते. याचा अर्थ 50 टक्के नागरिक मतदानाचा आपला हक्क बजावत नाहीत. मतदान न करण्याचा परिणाम निकालावर हाेत असताे. त्यामुळे मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी एक तरुण पुण्याहून सायकलवर लातूरला निघाला आहे.
गणेश मुसळे असे या तरुणाचे नाव आहे. गणेश हा मूळचा लातूरचा. सध्या ताे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम काॅमच्या प्रथम वर्षाला आहे. पुणे ते लातूर असा सायकल प्रवास करत ताे मतदान करण्यासाठी आपल्या गावी जाणार आहे. वाटेत जी गावे, शहरं लागतील तेथे ताे मतदान करण्याबाबत जागृती करत आहे. विशेष म्हणजे ताे या प्रवासात एकही रुपया घेऊन प्रवास करत नाहीये. वाटेत ताे कशाबाबत सायकल वारी करताेय हे कळाल्यावर त्याला नागरिक स्वतःहून जेवण देतात. 17 ऑक्टाेबरला ताे पुण्यातून सायकलवर लातूरकडे निघाला आहे. चला मतदान करुया महाराष्ट्र घडवूया असे त्याच्या यात्रेचे घाेषवाक्य आहे.
त्याच्या या उपक्रमाबाबत लाेकमतशी बाेलताना मुसळे म्हणाला, मी मूळचा लातूरचा. पुण्यात शिक्षणासाठी आलाे आहे. माझ्यासारखे हजाराे, लाखाे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येत असतात. निवडणुकीच्या वेळी मात्र यातील अनेक लाेक आपल्या गावी मतदानासाठी जात नाहीत. अनेकजण नाेकरीनिमित्त शहरांमध्ये स्थायिक असतात ते देखील मतदानासाठी गावी जात नाहीत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी हाेत असते. त्यामुळे चला मतदान करुया महाराष्ट्र घडवूया हे घाेषवाक्य घेऊन मी पुण्याहून लातूरला सायकलवर निघालाे आहे. या प्रवासात जे काेणी भेटेल त्याला मी मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.