पुणे : पुणे शहरातील सर्वाधिक चुरस पुणे कँटोंमेंट विधानसभा मतदार संघात दिसत असून त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी सर्वाधिक रॅली, मिरवणुका, पदयात्रा आणि जाहीर सभा या मतदारसंघात प्रचाराच्या काळात घेतल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने चर्चेत राहिलेल्या व केवळ दोनच प्रमुख उमेदवार असल्याने या विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी पदयात्रा, मिरवणुका, जाहीरसभा झाल्या. निवडणुक प्रचार काळात पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या ९ विधानसभा मतदारसंघात एकूण ७३२ रॅली, मिरवणुका, पदयात्रा काढण्यात आल्या असून २१८ कोपरा सभा, जाहीर सभा, पथनाट्याचे प्रयोग करण्यात आले. त्यात १४२ सर्वाधिक रॅली, पदयात्रा पुणे कॅटोंमेट मतदारसंघात झाल्या असून ५४ कोपरा सभा, जाहीर सभा, पथनाट्य झाले आहेत.
शहर पोलीस दलाकडून घेण्यात आलेल्या परवान्यावरुन ही माहिती उपलब्ध झाली आहे़ त्यात सर्व उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघात काढलेल्या मिरवणुका, रॅली, पदयात्रा, कोपरा सभा, जाहीर सभा, पथनाट्य यांचा समावेश आहे. वडगाव शेरीमध्ये सर्वात कमी ४ जाहीर सभा झाल्या. तेथील उमेदवारांनी रॅली, पदयात्रांवर भर दिल्याचे दिसून येते़ त्यासाठी ११८ पदयात्रा, मिरवणुकीसाठी परवानगी घेण्यात आली होती. वडगाव शेरी खालोखाल पर्वती मतदारसंघात ११५ रॅली, पदयात्रा काढल्या गेल्या. तर १७ जाहीर सभा घेण्यात आल्या होत्या. पुणे शहर पोलीस दलाच्या हद्दीत पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा थोडा भाग येतो तर खडकवासला मतदारसंघातील काही भाग हा ग्रामीण पोलीस दलात येतो़ त्यामुळे तेथील पदयात्रा, जाहीरसभांची संख्या कमी आहे.