पुणे: सळसळत्या युवकांचा ‘आव्वाज’ असणारी शिवसेनेने राज्यात विधानसभा निवडणुकीत नव्याने सामर्थ्य मिळवलेले असताना प्रथम पुणे शहर व आता त्यानंतर जिल्ह्यातूनही शिवसेना राजकीय दृष्ट्या हद्दपार झाली आहे. नव्याजुन्या शिवसैनिकांना या राजकीय वाताहतीचे दु:ख होत असले तरी ते ऐकायला शिवसेनेच्या मुंबईतील नेतृत्त्वाला वेळच नाही असे दिसते आहे.भाजपाने शिवसेनेला पुणे शहरात एकही जागा दिलेली नव्हती, त्यामुळे पुण्यात अस्तित्व नाही व आता जिल्ह्यात लढवत असलेल्या चारही जागांवर पराभव झाल्यामुळे शिवसेना जिल्ह्यातून राजकीय मंचावरून गायबच झाली आहे. पुणे शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहे. सन २०१४ मध्ये युती तुटली व शिवसेना भाजपा स्वतंत्रपणे लढले. त्यात पुण्यातील आठही जागांवर भाजपाला विजय मिळवला. त्यानंतर भाजपाने पुण्यातील शिवसेनेला कधीही मान वर करू दिली नाही. लोकसभेला बरोबर घेतले तरी महापालिकेत मात्र वेगळे केले. त्यामुळेच पालिकेत शिवसेना ९ सदस्यांची तर त्याच वेळी भाजपा मात्र ९८ सदस्यांसह स्पष्ट बहुमतात असे झाले. आता सन २०१९ च्या लोकसभेलाही भाजपाने शिवसेनेला बरोबर घेतला. त्यातून गिरीश बापट यांना ४ लाखांपेक्षा अधिक मते मिळाली. मात्र त्यानंतर आता लगेचच झालेल्या विधानसभेत भाजपाने शिवसेनेला पुर्ण डावलेले. एक तरी जागा द्यावी या त्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष केले. त्यातून पुणे शहरातून विधानसभेसाठी शिवसेना हद्दपारच झाली. पालिकेतील ९ नगरसेवक एवढीच त्यांची राजकीय ताकद शहरात शिल्लक राहिली आहे. त्यांचाही बराचसा वेळ भाजपाबरोबर लढण्यातच जात असतो. पालिकेतील सत्तेपासून भाजपाने त्यांना वंचितच ठेवले आहे.तरीही पुणे जिल्ह्यातील खेड ( सुरेश गोरे), जुन्नर (श्रद सोनवणे), भोर( कुलदीप कोंडे), आंबेगाव (राजाराम बाणखेले) व पुरंदर ( मंत्री विजय शिवतारे) अशा पाच जागा शिवसेना लढवत होती. मंत्री शिवतारे यांच्यासह या सर्व जागांवर शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोºहे यांच्याशिवाय शिवसेनेचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. खासदार शिवाजीराव आढळराव यांचाही सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, त्यामुळे खासदारही नाही.एकेकाळी शिवसेनेचा पुण्यात मोठ्ठा आवाज होता. युती सरकारच्या काळात शशिकांत सुतार कृषीमंत्री होते. त्याच्याही पुर्वी नंदू घाटे, काका वडके हे शिवसेनेचा पुण्यातील आवाज होते. गजानन बाबर हे मावळ मधून खासदार होते. पुण्यात सुर्यकांत लोणकर, विनायक निम्हण, दीपक पायगुडे, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर असे आमदार होते. आता मात्र कोणीही नाही अशी शिवसेनेची राजकीय अवस्था झाली आहे.
महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे शहरानंतर जिल्ह्यातूनही शिवसेनेचा "आव्वाज " हद्दपार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 7:00 AM