महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुण्याचं मैदान भाजपने मारलं! मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने झुंजवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 07:47 PM2019-10-24T19:47:29+5:302019-10-24T19:56:55+5:30
शहरातील आठही मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वर्चस्व राखलेल्या भाजपाला २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलेच झुंजविले...
पुणे : शहरातील आठही मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वर्चस्व राखलेल्या भाजपाला २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलेच झुंजविले. हडपसर व वडगाव शेरीतील चुरशीच्या लढतीत विजय खेचून आणत राष्ट्रवादीने भाजपाला आस्मान दाखविले. तर खडकवासल्यातही जोरदार टक्कर देत राष्ट्रवादीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले. पुणे कॅन्टोन्मेंट व शिवाजीनगर मतदारसंघातही दोन्ही काँग्रेसची एकजुट भाजपासाठी मोठी डोकेदुखी ठरली.
मागील विधानसभा निवडणुक दोन्ही काँग्रेस, भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. यामध्ये भाजपाची आठही मतदारसंघात सरशी झाली होती. त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीतही दोन्ही काँग्रेसची मोठी घसरण झाली. त्यामुळे एकेकाळी शहरावर वर्चस्व असलेल्या काँग्रेसची दयनीय स्थिती झाल्याचे चित्र होते. उपनगरांमध्येही राष्ट्रवादीची ताकद कमी झाल्याने नेते, कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण झाली होती. परिणामी या विधानसभा निवडणुकीत शहरातील बहुतेक जागांवर भाजपा-शिवसेना महायुती सहजपणे पुन्हा विजयी होईल, अशीच अटकळ बांधली जात होती. प्रचारादरम्यानही दोन्ही काँग्रेसमध्ये जोर लावल्याचे दिसून आले नाही. पण प्रत्यक्ष निकाल हाती येऊ लागल्यानंतर भाजपाला एकावर एक धक्के बसु लागले.
काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा व शिवाजीनगर मतदारसंघापैकी कॅन्टोमेटमध्ये लढत होईल, अशी शक्यता होती. अपेक्षेप्रमाणे रमेश बागवे यांनी भाजपाच्या सुनिल कांबळे यांच्यासमोर आव्हान उभे केले. पहिल्या फेरीपासून कांबळे यांना विजयासाठी झुंजावे लागले. माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, सुधीर जानजोत तसेच कॅन्टोमेंट बोडॉतील काँग्रेसचे चार नगरसेवकही ऐनवेळी भाजपात गेले. तसेच वंचित आघाडीकडून काँग्रेसचे माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे आणि ‘एमआयएम’ने घेतलेली मते बागवे यांचा पराभव करणारी ठरल्याचे दिसते. या प्रतिकुल परिस्थितीतही बागवे यांना मागील निवडणुकीत पडलेली सुमारे ३९ हजार मते यावेळीही कायम राहिली. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी सुमारे ४७ हजार मते मिळविली. मागील निवडणुकीत काँग्रेसला ३१ हजार मते मिळाली होती. तर सध्या काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक असलेले व त्यावेळी मनसेकडून लढलेले रविंद्र धंगेकर यांनी २६ हजार तर राष्ट्रवादीचे दिपक मानकर यांना सुमारे १६ हजार मते मिळाली होती. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने एकत्रितपणे लढत दिल्याचे मतांवरून दिसून येते.
------------
शिवाजीनगर मतदारसंघातील लढत एकतर्फी होईल, ही शक्यता काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी फोल ठरविली. या मतदारसंघातही काँग्रेसला काही धक्के बसले. काँग्रेसचे माजी महापौर दत्ता गायकवाड, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, खडकी कॅन्टोन्मेंट बोडॉतील चार नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपाला साथ दिली. तसेच मागीलवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले अनिल भोसलेही पक्षासोबत नव्हते. त्यामुळे भाजपाचे सिध्दार्थ शिरोळे यांचा विजय सुकर झाल्याचे चित्र होते. पण बहिरट यांनी पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत ही लढत रंगतदार ठरली. मागील निवडणुकीत तब्बल २२ हजारांनी निवडून आलेल्या भाजपाला यावेळी केवळ ५ हजारांचे मताधिक्य मिळाले.हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी भाजपाचे योगेश टिळेकर यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणली. मागील निवडणुकीत तुपे यांनी सुमारे ३० हजार तर टिळेकरांना ८२ हजार मते मिळाली होती. त्यावेळी शिवसेनेचे महादेव बाबर यांना ५२ हजार मते होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र तुपे यांना तिप्पट मते मिळाली. दोन्ही काँग्रेसची एकजुट त्यांना विजयाकडे घेऊन गेली.
वडगाव शेरी मतदारसंघात सुनिल टिंगरे यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा म्हणावा लागेल. अत्यंत प्रतिकुल स्थिती असताना टिंगरे यांनी ही लढत जिंकली. माजी आमदार बापु पठारे यांनी ऐनवेळी त्यांना धक्का दिला. तसेच नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती व काही पदाधिकाºयांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाचे जगदीश मुळीकांचा विजय निश्चित मानला जात होता. पण टिंगरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकाकी झुंज देत मुळीक यांचे आव्हान मोडून काढले. मागील निवडणुकीत शिवसेनेकडून लढताना त्यांचा केवळ ५ हजार ३०० मतांनी पराभव झाला होता. यंदा जवळपास तेवढ्याच मताधिक्याने ते विजयी झाले. त्यांनी दिलेली लढत चर्चेचा विषय ठरली.
पर्वती मतदारसंघात भाजपाच्या माधुरी मिसाळ यांना विजयासाठी फारसे झगडावे लागले नाही. पण राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांनी मागील निवडणुकीच्या तुलनेत मिळविलेली ६० हजारांहून अधिक मते उल्लेखनीय ठरली.खडकवासला मतदारसंघातील लढतही चुरशीची ठरली. राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांनी आमदार भीमराव तापकीर यांना अखेरच्या फेरीपर्यंत वाट पाहायला लावली. वारजे-माळवाडीत मिळालेली भरघोस मते तसेच अन्य भागातूनही त्यांचा मिळालेली पसंती त्यास कारणीभुत ठरली. केवळ २६०० मतांनी त्यांचा पराभव झाला. मागील निवडणुकीत तापकीर तब्बल ६३ हजार मतांनी विजयी झाले होते. राष्ट्रवादीने दिलेली ही लढत भाजपासाठी धोक्याची घंटा ठरली आहे.