पुणे - विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीला राज्यभरात बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे निवडणूक निकालांपूर्वीच पुणे येथील भाजपा खासदार गिरीश बापट यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार मुक्ता टिळक यांच्या विजयाचे भाकित लिहून ठेवलं आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी गिरीश बापट यांना खासदारकीची संधी मिळाल्यानंतर त्यांच्या जागी कसबातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली. कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा गड मानला जातो. गिरीश बापट या मतदारसंघातून निवडून येत होते. मागील निवडणुकीतही पुणे शहरातील सर्व ८ जागांवर भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाला होता. त्यामुळे यंदाची भाजपाला पुण्यातून मोठं यश मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खासदार गिरीश बापट यांनी सांगितले की, मतदानाच्या दिवशी घेतलेल्या आढाव्यानंतर मी दरवेळी मताधिक्याचा अंदाज लिहून ठेवतो. रात्री कसबा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या मताधिक्याचा आकड्यासह अंदाज लिहून ठेवला. लोकसभा निवडणुकीत स्वत:ला किती मते मिळणार याचा माझा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. यावेळी गिरीश बापट यांनी फलकावर मुक्ता टिळक यांना ५० हजार मताधिक्य मिळणार असं भाकीत लिहून ठेवलं आहे.
तसेच कोथरुड विधानसभा मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. कोथरुडमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मनसेच्या किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं असलं तरी या मतदारसंघात १ लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटील विजयी होतील असा विश्वास गिरीश बापटांनी व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे पुण्यात मतदान प्रक्रिया संपवून काही तासच उलटले असताना दोन उमेदवारांच्या समर्थकांनी चक्क आपापल्या नेत्यांच्या विजयाचे फ्लेक्स लावत आणि मिरवणूक काढत जोरदार आताषबाजी केली आहे. त्या स्वयंघोषित विजयी उमेदवारांची नावे खडकवासला मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार सुनील कांबळे. अशी आहेत. त्यामुळे लग्नाआधीच गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या या उत्साही उमेदवारांची चर्चा पुण्यात जोरदार रंगू लागली आहे.