लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कितीही टीका करो, पण त्यांच्या पदाच्या नावे असणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्याने पहिला क्रमांक मिळवला आहे. हा क्रमांक लाभार्थी संख्येच्या स्तरावर तर आहेच, शिवाय सर्वाधिक लाभार्थ्यांची पाहणी करण्यासाठीही आहे.
यानिमित्त राज्याच्या कृषिमंत्र्यांचा थेट राजधानी दिल्लीत गौरव होणार आहे. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर झाली. या योजनेत शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात २ हजार प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात वर्षभरात ६ हजार रूपये जमा होतात.
आतापर्यंत २ वर्षांमध्ये या योजनेतंर्गत राज्यात १ कोटी १४ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ कोटी ५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ११ हजार ६३३ कोटी रूपये जमा केले आहेत. देशातील एका राज्याची ही सर्वाधिक लाभार्थी संख्या आहे.
यापैकी ५ टक्के लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने राज्याकडे ४ लाख ६८ हजार ७४७ शेतकऱ्यांची नावे पाठवली. सरकारी यंत्रणेने त्यातील ९९.५४ टक्के लाभार्थ्यांची प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली. अशी तपासणी करणारेही महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.
या योजनेंतर्गत राज्यात ३८ हजार ९९१ तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यातील तब्बल २३ हजार ६३२ तक्रारींचा समाधानकारक निपटारा केला. असे करणारेही महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. या तिन्ही कामगिऱ्यांबद्दल केंद्र सरकारच्या वतीने राज्याचा व निवडक जिल्ह्यांचा दिल्लीत २४ फेब्रुवारीला केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करणार आहे.
कोट
राज्याच्या कृषी खात्यासाठी ही मोठीच सन्मानाची गोष्ट आहे. कृषी विभाग तसेच अन्य सरकारी यंत्रणांनी या योजनेसाठी जोमाने काम केल्यामुळेच हे शक्य झाले.
- विनयकुमार आवटे, पीएम किसान प्रकल्प अंमलबजावणी प्रमुख