पुणे: पूजा खेडकर.. २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी.सध्या या मॅडमची जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थात चर्चा सुरू आहे ती यांच्या चमकोगिरीची. आणि याच चमकोगिरीच्या हव्यासापाई त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. म्हणजे मॅडमना पुण्याहून थेट वाशीमलाच पाठवण्यात आलय. याप्रकरणी आता नवी अपडेट समोर आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
खेडकर यांनी पुणे जिल्ह्यातील कार्यालयात प्रोबेशन अधिकारी म्हणून रुजू होताच आपल्या खाजगी ऑडी गाडीवर महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावला. एकच नाही तर या गाडीला लाल आणि निळा दिवाही लावून घेतला. ऑडी गाडी वर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावणे या प्रकरणी चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच पूजा खेडकर यांनी गाडीवर "महाराष्ट्र शासन" अशी पाटी देखील लावली होती याप्रकरणी देखील पोलिसांकडून चौकशी होणार आहे. खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कार वर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी २१ हजार रुपयांचा दंड सुद्धा आकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागली तक्रार
भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. जिल्ह्याचे कामकाज कसं चालतं याची माहिती त्यांना घ्यावी लागते. वेगवेगळ्या विभागात काम करावं लागतं. आणि या कामाचा अनुभव आल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात येते. मात्र नुकत्याच आयएएस झालेल्या पूजा खेडकर यांची बात काही औरच. कारण प्रोबेशन पीरियड सुरू असतानाच या मॅडमला गाडी बंगला आणि दिमतीला शिपाई पाहिजे.. मात्र नव्यानेच अधिकारी झालेल्या या मॅडमना जुन्या जाणत्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजावूनही पाहिलं. मात्र तरीही मॅडमचा रुबाब काही कमी होईनाच. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी २५ पानांचं पत्र लिहीत थेट या मॅडमची मंत्रालयात तक्रार केली होती. तक्रारीची खातरजमा करण्यात आली. आणि त्यानंतर मॅडमची बदली पुणे जिल्ह्यातून थेट वाशिम जिल्ह्यात करण्यात आली.