पुणे: भर पावसात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला. गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीच नाही तर सरकारनेच राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ शरद पवार व सर्व आंदोलक बसले होते. खासदार सुप्रिया सुळे,महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महात्मा गांधीजींचे स्मरण करून त्यांचे भजन उपस्थितांकडून म्हणून घेतले.
शरद पवार म्हणाले, देशातील राज्याचा नावलौकिक अशा घटनांमुळे काळवंडला आहे. एक दिवस असा जात नाही की राज्यात कुठे ना कुठे भगिनींवर अत्याचार होत नाही. एका महिलेवर अत्याचर झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हात काढण्याचा आदेश दिला होता. अशा घटनेचा निषेध करणे म्हणजे राजकारण असे समजत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत हे लक्षात येते.
त्यांनतर पवार यांनी उपस्थितांना शपथ दिली. मी अशी शपथ घेतो कि माझे घर गाव ऑफिस कुठेही असे काही होत असेल, महिलांची छेडछाड अत्याचार होत असतील तर मी त्यास विरोध करेल. आवाज उठवेल. मुलगा मुलगी असा भेदभाव करणार नाही. महाराष्ट्र आणि देशात सुरक्षीत व भयमुक्त वातावरणासाठी प्रयत्न करेल. माजी आमदार महादेव बाबर,दीप्ती चवधरी, जयदेव गयकवाड यांची भाषणे झाली. राष्ट्रगीतानंतर निषेध आंदोलन थांबवण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आभार व्यक्त केले.