दौंड : दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत यवत , पाटस , लिंगाळी , वरवंड , सोनवडी यासह महत्वाच्या गावात भाजपासह प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड देत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीचा हक्काचा मानला जाणारी गोपाळवाडी ग्रामपंचायत मात्र भाजपा पुरस्कत पॅनलकडे गेली आहे. एकंदरीतच गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. मात्र या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या आधिपत्याखाली असलेल्या पॅनलने तालुक्यात बाजी मारताना पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त काही ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे.अद्याप काही गावातील ग्रामपंचायत निकाल हाती यायचे बाकी आहे.
दौंड, हवेली आणि आंबेगाव तालुक्यातील काही किरकोळ प्रकार वगळता संपूर्ण जिल्ह्यात शांतते मतदान पार पडले होते . जिल्ह्यात 649 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 80.54 टक्के मतदान झाले. यामुळे तब्बल 11 हजार 7 उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी (दि.15) रोजी मतदान यंत्रात बंद झाले होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. उमेदवार, कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्र अगदी गर्दीने खच्च भरली आहे.
कोरोना व लाॅकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या 748 ग्रामपंचायतीच्या निवडणुकी जाहीर झाल्या. यात 95 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने शुक्रवारी 649 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. यात दौंड तालुक्यात दोन गटांत हाणामारी, हवेली तालुक्यात गाडी फोडली, आंबेगाव तालुक्यात दुबार मतदान असे काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. यात जिल्ह्यात सर्वाधिक 86.69 टक्के मतदान वेल्हा तालुक्यात तर सर्वात कमी हवेली तालुक्यात 73.98 टक्के मतदान झाले होते.