पुणे : देशाच्या उत्तर पश्चिम, पश्चिम, मध्य भागात पश्चिमी चक्रावाताची स्थिती निर्माण होण्यासह मध्य भारतात तयार झालेल्या द्रोणीय रेषेमुळे राज्यात बुधवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गुरुवारी व शुक्रवारी याची तीव्रता वाढून गारपिटीसह सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
राज्यात उत्तर व मध्य भागात मंगळवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट झाल्याची नोंदही झाली. बुधवारी उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या पश्चिमी, दक्षिण पश्चिमी वाऱ्यांमुळे जमिनीवर मोठ्या प्रमाणावर आर्द्रता येत आहे. त्याच वेळी दिवसाचे तापमानही ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान असल्याने ऊन, आर्द्रता व वाऱ्यांमुळे पावसाची स्थिती तयार झाली आहे. यामुळे सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गुरुवारी व शुक्रवारी यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी याचा प्रभाव कमी होईल. मात्र, ढगाळ वातावरण कायम राहील. रविवारी व सोमवारी त्यात आणखी घट होईल. सोमवारनंतर वातावरण निरभ्र होण्याची शक्यता आहे.”
असा आहे अंदाज
- १५ मार्च : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यांसह (३० ते ४० किमी प्रतितास) पावसाची शक्यता आहे. विदर्भ, कोकण व गोव्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
- १६ मार्च : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यांसह (३० ते ४० किमी प्रति तास) पावसाची शक्यता असून, कोकण व गोव्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
- १७ मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यांसह (४० ते ५० किमी प्रतितास) पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण व गोवा विभागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
- १८ मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यांसह (३० ते ४० किमी प्रतितास) पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ विभागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.