- नम्रता फडणीसपुणे : अन्य राज्यांतील कलावंतांना कशी काय परदेशी जाण्याची संधी मिळते? असे म्हणून महाराष्ट्रातील कलावंतांकडून नेहमीच नाके मुरडली जातात. मात्र परदेशात कार्यक्रम करण्यासाठी रीतसर अर्ज करावा लागतो, या माहितीपासूनच लोककलावंत अद्याप ‘अनभिज्ञ’ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच परदेशी लोककलावंत पाठविण्याच्या केंद्र सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन (आयसीसीआर) च्या यादी प्रणालीमध्ये ‘महाराष्ट्र’ ईशान्य भारत, राजस्थान आणि केरळ राज्यांच्या तुलनेत अद्यापही पिछाडीवर आहे.गेल्या तीन वर्षांत देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रातून केवळ १० अर्जच संस्थेकडे आले असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून एक प्रकारे लोककलावंतांची उदासीनता दिसून येत आहे. लोककलावंतांना परदेशात कार्यक्रमाला पाठविण्याकरिता केंद्र सरकारची इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन (आयसीसीआर) नावाची संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या संकेतस्थळावर रीतसर अर्ज उपलब्ध आहेत. त्या अर्जासोबत कलावंतांनी सीडी पाठवणे अपेक्षित असते.त्या अर्जांची छाननी होऊन देशभरातली लोककला पथकांची एक मास्टर यादी तयार होते. परदेशात कार्यक्रम करण्याची संधी आल्यास यादीमध्ये समाविष्ट लोककलावंतांच्या पथकांना पाठविले जाते. मात्र संपूर्ण देशभरातून अर्ज येणाऱ्या संख्येमध्ये महाराष्ट्र अत्यंत पिछाडीवर आहे. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातून दहाच्यावर अर्जांची संख्या गेलेली नाही. त्यातुलनेत इतर राज्यांमध्ये हे प्रमाण २५ ते ५० च्या आसपास आहे. लोककलावंतांमध्ये माहितीचा अभाव हे अर्जाच्या कमी संख्येमागील प्रमुख कारण असल्याची माहिती आयसीसीआरच्या लोककला छाननी समितीचे सदस्य डॉ. प्रकाश खांडगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आयसीसीआरची ही योजना केवळ लोककलांवतांनाच नव्हे, तर शास्त्रीय संगीत, नृत्य क्षेत्रामधील कलाकारांनादेखील लागू होते. मात्र याबाबत कलावंतसुद्धा अनभिज्ञ आहेत. त्यामुळे परदेशी जाणाºया पथकामध्ये ईशान्य भारत, राजस्थान आणि केरळ राज्यातील अधिकांश कलावंतांचा समावेश आहे. शासकीय सोयी व सुविधा कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी लोककलावंतांमध्ये उद्बोधन होणे गरजेचे आहे.लोककलावंतांचे महाशिबिर घ्यावेलोककलावंताचे महाशिबिर आयोजित करून शासनाने राज्य आणि केंद्र शासनांच्या योजनांची माहिती द्यायला हवी. शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठीही कलावंतांची साँग अँड ड्रामा विभागामार्फत निवड केली जाते. पण ही निवड करताना नक्की अर्ज कुठे करायचा, त्याची छाननी कशी असते, मानधन किती मिळते, याबाबतचे मार्गदर्शन त्यांना केले जात नाही. यामध्ये शासकीय कर्मचाºयांचीही उदासीनताही कारणीभूत आहे. राज्याच्या सहा महसुली विभागात सांस्कृतिक संचालनालयाने शिबिर घेण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केली.- महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार नेण्याकरिता कलावंताना उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.मात्र याविषयी माहिती नसणे आणि माहिती करून घेण्याची उत्सुकता नसणे यामुळे लोककलावंत या चांगल्या योजनेपासून वंचित राहत आहेत.परदेशात कार्यक्रमासाठी जाणाºयांमध्ये महाराष्ट्रातील पथकांची संख्या अत्यंत कमी आहे.