बारामती : महाराष्ट्राने यापूर्वी राजकीय कटुता पाहिली होती. परंतु इतके गलिच्छ राजकारण पाहिले नव्हते. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासंबंधी सध्या जे चालले आहे, ते अस्वस्थ करणारे असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी सुळे पुढे म्हणाल्या ,देशमुख, मलिक व राऊत कुटुंबीय कोणत्या परिस्थितीतून जातेय हे मी पाहते आहे .परंतु गेल्या आठवड्यात एका भाजप नेत्याच्या तोंडी बदला हा शब्द आहे. त्यांनी हो मी बदला घेतला असे विधान केले. त्यांची ही भाषा अत्यंत दुदैवी असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. ज्या संस्कृतीत मी वाढले, ती ही संस्कृती नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आपण जपतो. त्यात विरोधक हा वैचारिक विरोध करत असतो. त्यात बदल्याची भाषा नसते. बदला घेतल्याची भाषा मी पहिल्यांदा ऐकली. हे अतिशय दुदैवी आहे. ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ते पाहता विरोधकांचे ते पुढील टार्गेट असावेत. महाराष्ट्राने इतके गलिच्छ राजकारण यापूर्वी पाहिले नव्हते, असेही सुळे म्हणाल्या.
ते जुनेच विषय उगाळून काढत आहेत खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी केली आहे, यावर त्यांनी या मागणीला आमचा पाठींबा असेल असे स्पष्ट केले. काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल सुरु असलेल्या गदोराळासंबंधी त्या म्हणाल्या, विरोधकांकडे बोलण्यासाठी सध्या काहीही उरलेले नाही. त्यामुळे ते जुनेच विषय उगाळून काढत आहेत. या विषयावर यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे.
कारवाई पूर्णतः चुकीची असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले संजय राऊत यांचा जामिन रद्द व्हावा अशी मागणी इडीने केली असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, जोपर्यंत उच्च न्यायालयाकडून ऑर्डर येत नाही तोपर्यंत त्यावर बोलता येणार नाही. त्यांची मागील ऑर्डर मी पूर्णपणे वाचली. त्यात त्यांच्यावर झालेली कारवाई पूर्णतः चुकीची असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे फारशी चिंता करावी असे मला वाटत नाही, असे त्या म्हणाल्या.
विषय आता राजकीय नसून सामाजिक झाला
हर हर महादेव चित्रपटासंबंधी त्या म्हणाल्या, एखादा सिनेमा इतिहासावर असेल. तर किती लिबर्टी घ्यावी हे पाहिले पाहिजे. हा विषय आता राजकीय नसून सामाजिक झाला आहे. छत्रपतींचा कोणी चुकीचा इतिहास दाखवत असेल तर त्याचा जाहीर निषेध झालाच पाहिजे.