पुणे : राज्यामध्ये उष्णतासदृश लाट खान्देश, मराठवाड्यात राहणार असून, खान्देशात रात्रीचा उकाडाही वाढेल, असा इशारा ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे. खान्देश आणि मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांत उष्णतासदृश लाट टिकून असेल. तर खान्देशात रात्रीचा उकाडाही या दोन दिवसांत जाणवेल, असेही त्यांनी सांगितले.
मान्सून गुरुवारी (दि. ३०) केरळ राज्याच्या दक्षिण टोकावर पोहोचून तेथे तो सक्रिय झाला आहे. यावर्षी त्याच्या आगमनाचे भाकीत ३१ मे २०२४ रोजी होते; पण दोन दिवस अगोदरच तो देशाच्या भू-भागावर प्रवेशित झाला आहे. मान्सूनच्या केरळमधील आगमनानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत, शनिवारपासून (दि. १ जून ते ३ जून) वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील २ दिवस उष्णतेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत मात्र आजपासून (दि.३०) पुढील ३ दिवस म्हणजे एक जूनपर्यंत, सध्या चालू असलेल्या ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम राहील, असेही खुळे यांनी सांगितले.
राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातील तापमान चांगलेच तापले असून, ब्रह्मपुरी येथे ४६.९ कमाल तापमानाची नोंद झाली. सर्वांत कमी किमान तापमान महाबळेश्वरला १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील कमाल तापमान ४२ ते ४६ अंशांवर नोंदले गेलेे. त्यामुळे उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत. मराठवाड्यातही सर्व जिल्हे चाळीशीपार गेले आहेत. सातारा, सांगली, नाशिक, मुंबई, रत्नागिरी या ठिकाणचे कमाल तापमान ३५-३६ अंशांवर होते.
राज्यातील कमाल तापमान
पुणे - ३६.५
नगर - ४१.१
जळगाव - ४२.१
कोल्हापूर - ३५.५
महाबळेश्वर - २८.०
मालेगाव - ४१.८
नाशिक - ३६.१
सांगली - ३६.४
सातारा - ३५.३
सोलापूर - ४०.०
मुंबई - ३५.१
रत्नागिरी - ३५.०
उस्मानाबाद - ४०.०
छत्रपती संभाजीनगर - ४०.४
बुलढाणा - ३९.०
परभणी - ४२.१
नांदेड - ४२.६
बीड - ४१.५
अकोला - ४२.९
चंद्रपूर - ४५.६
गोंदिया - ४४.८
नागपूर - ४४.६
वाशिम - ४२.८
वर्धा - ४५.०
ब्रह्मपुरी - ४६.९