महाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प: पुण्यासाठी काय? सारथी, बार्टीमधून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी
By श्रीकिशन काळे | Published: June 28, 2024 06:25 PM2024-06-28T18:25:13+5:302024-06-28T18:26:23+5:30
अर्थसंकल्पामध्ये बी.जे. शासकीय वैद्यकीय महादविद्यालय, पुणे येथे बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे....
पुणे : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.२८) सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात पुण्यासाठी विशेष तरतूद म्हणजे पुणे मेट्रोची लांबी वाढविणार आणि अधिक मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. तसेच रोजगारभिमुख योजनेतून विद्यार्थ्यांचा रोजगाराची संधी मिळणार आहे. त्याशिवाय ठोस अशी मोठी योजना पुण्यासाठी नाही. अर्थसंकल्पामध्ये बी.जे. शासकीय वैद्यकीय महादविद्यालय, पुणे येथे बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) इत्यादी संस्थांमार्फत एकूण २ लाख ५१ हजार ३९३ विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून ५२ हजार ४०५ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे.
अवसरी खुर्द, पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यामुळे तंत्रशिक्षणामध्ये अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होईल. स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई-शिरसाई, पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनांचे सौर उर्जीकरण करण्यासाठी ४ हजार २०० कोटी रूपये खर्चाची तरतूद केली आहे. त्यामुळे या योजना पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत.
पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश
जागतिक वारसा नामांकनासाठी शिवकालीन १२ किल्ल्यांचा युनोस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये पुण्यातील शिवनेरी, लोहगड, राजगड या किल्ल्यांचा समावेश आहे. पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिध्द आहे. या गणेशोत्सवासाठी देखील विशेष तरतूद करण्यात येणार आहे.
मेट्रो सुसाट धावणार
पुणे शहरामधील मेट्रो मार्गिकांची लांबी वाढविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या वर्षामध्ये आणखी काही मार्गिका वाहतूकीसाठी खुल्या करण्यात येणार. सध्या मेट्रो ठराविक मार्गावर धावत आहे. त्यामुळे पुणेकरांना त्याचा पूर्णपणे लाभ घेता येत नाही. मेट्रो मार्गिकांची लांबी वाढविण्यात आली, तर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.