पुणे: राज्याचा ऊस गाळप हंगाम संपला असून यंदाही राज्याने साखर उत्पादनात अव्वल क्रमांक कायम राखला आहे. यंदा राज्यात १०५ लाख टन साखर उत्पादित झाली असून देशात दुस-या क्रमांकावर उत्तर प्रदेशात १०२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे, अशी माहिती साखर आय़ुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल निर्मिती क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. पुढील वर्षाअखेरीस ती तीनशे कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तर पाच साखर कारखान्यांनी रसापासून इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली आहे. या कारखान्यांनी साखर उत्पादन बंद केले आहे. पुढील काळात निर्यातीवरील बंदीमुळे आणखी काही कारखाने पूर्णपणे इथेनॉल उत्पादनकडे वळतील. त्यामुळे राज्याची वाटचाल ब्राझीलच्या दिशेने सुरू आहे.’’ कारखान्यांनी इथेनॉल विक्री केल्यानंतर तेल कंपन्या एकवीस दिवसांत पैसे देत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील १२२ सहकारी, खासगी व स्टँड अलोन कारखान्यांची २२६ कोटी लिटर इथेनॉल ब्लेंडिंग क्षमता तयार झाली आहे. यंदाच्या वर्षी साखर कारखान्यांना १३२ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे आदेश मिळाले असून, आतापर्यंत ४८ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा
राज्यात साखरेची वार्षिक गरज ३५ लाख टन असून, त्याच्या तिप्पट म्हणजे १०५ लाख टन साखर उत्पादित होते. त्यापैकी २३ लाख टन साखर निर्यात होत असून, पर्यायाने देशाच्या साठ लाख टन साखर निर्यातीत राज्याचा मोठा वाटा आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून, जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आगामी काळातही राज्यातील साखर कारखानदारीचे भवितव्य उज्ज्वल राहणार असून, शेतकऱ्यांना समृद्ध करणारा मोठा उद्योग ठरणार आहे, असेही साखर आय़ुक्तांनी सांगितले.