पुणे : सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक अशा सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रभागी आहे. विविधतेत एकजूट हे महाराष्ट्रानेच देशाला दाखवले व महाराष्ट्रच त्यासाठी लढला असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्रानेच मुहुर्तमेढ रोवली असे ते म्हणाले.
लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ कोविंद यांच्या हस्ते झाला. सविता कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे, ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त शिवराज कदम जहागीरदार व्यासपीठावर उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने सर्व पाहुण्यांचे दत्त प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.
कोविंद म्हणाले, गणपती मंदिर, दत्त मंदिर यामुळे पुण्यात एक नवी चेतना मिळते. ही भूमीच महान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांनी या भूमीला पावन केले आहे. देशातील मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी इथेच सुरू केली. डॉ. आंबेडकरांचे आंदोलन इथूनच सुरू झाले. त्यामुळे महाराष्ट्राची भूमीही थोर आहे. १२ ते १३ वेळा महाराष्ट्रात आलो. रायगडावर जाऊन शिवछत्रपतींच्या समाधीला वंदन करण्याचे सौभाग्य मिळाले.
प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती कोविंद यांचे स्वागत केले. मंदिराच्या जिर्णोद्धाराची सुरूवात राष्ट्रपती असताना आपल्या हातून झाली होती याचे स्मरण त्यांनी करून दिले. निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. प्राजक्ता काळे यांना ट्रस्टच्या वतीने कोविंद यांच्या हस्ते लक्ष्मीबाई पुरस्कार देण्यात आला. ॲड. परदेशी यांनी प्रास्तविक व स्वागत केले. राहूल सोलापूरकर यांनी पुरस्कारार्थीचा परिचय करून दिला व सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मंदिराचा इतिहास सांगणाऱ्या ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण झाले. शिवराज कदम यांनी आभार व्यक्त केले.