प्रकाश शेलार
पुणे : पंडीता रमाबाई यांनी १८९९ महाराष्ट्रातील सर्वात मोठे चर्च मिशनमध्ये बांधले. हे चर्च स्थापत्यशास्त्राचा आदर्श नमुना आहे. चर्चसाठी बरमाटीक लाकूड वापरण्यात आले असून हे लाकूड म्यानमार देशामधुन आणण्यात आले होते. वरून पाहिल्यास चर्चचा आकार येशू ख्रिस्तांना चढवण्यात आलेल्या क्रुसाच्या आकारासारखा आहे. एकूण बांधकाम १५२८७ स्क्वेअर फुट आहे. एकाच वेळी २००० लोक बसतील एवढी बैठक व्यवस्था आहे. छतावर कौलारू बांधकाम असून, दगडी बांधकामाच्यख भिंती व बसण्यासाठी फरशी ऐवजी लाकडाच्या फळ्या वापरण्यात आल्या आहेत. चर्चला एकूण ९ दरवाजे आहेत मुख्य दरवाजा पूर्व दिशेला आहे.
पंडिता रमाबाई यांचे वास्तव्य असलेली खोली
या मिशनमध्ये पंडीता रमाबाई एका खोलीमध्ये १८ वर्ष राहिल्या. त्या खोलीमध्ये रमाबाईंच्या दैनंदिन वापराच्या वस्तू, त्यांच्या वापरातील फर्निचर, भाषांतरासाठी वापरलेली पुस्तके, ताट, ग्लास ,पाण्याचे मोठे भांडे, तांब्या ठेवण्यात आले आहेत. रमाबाईंना मिळालेला कैसर ए हिंद पुरस्कार येथे ठेवण्यात आला आहे. शेजारील कोठारामध्ये त्याकाळी एक हजार लोकांना स्वयंपाक बनवण्यासाठी वापरलेली मोठ-मोठी पितळी भांडी ठेवण्यात आली आहेत.
रमाबाईंनी स्वतः बांधलेल्या १३ पाण्याच्या विहिरी
१०० वर्षापुर्वी पंडीता रमाबाई यांच्याकडे असणार्या दुरदृष्टीमुळे बांधलेल्या विहीरी आदर्श स्थापत्यशास्राचा नमुना आहेत. केडगाव व बोरीपार्धी ग्रामस्थ व मिशनमधील अनाथ हजारो चिमुकले व विद्यार्थी आजही या विहीरीचे पाणी पित आहेत.यामध्ये प्रिती ,तारण ,शांती ,कृपा ,धीर,उपकार ,विश्वास ,आशा ,उपळती ,याकोबाची ,बडी मोट ,पाळकांची विहीर अशा १२ विहीरी सलग बांधल्या.त्यानंतर प्रशासनाने (१३)स्तुती विहीर बांधली. १९८२ मध्ये मुक्ती मिशनच्या प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी वापरली जाणारी स्तुती विहीरीवर जलशुद्धीकरण यंत्रणा उभारली आहे.
शारदा सदन शाळा पाहण्यासारखी
अंध,अपंग ,अनाथ व निराधारासाठी उभारलेले शैक्षणिक संकुल-याशिवाय पंडिता रमाबाई यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ९ मार्च १८८९ चालु केलेली शारदा सदन शाळा पाहण्यासारखी आहे.अपंग व अंध मुलींसाठी शाळा, दुध डेअरी फार्म, फळशेती,प्रिंटीग प्रेस, कलाकुसर व्यवसाय, इतर मोठ्या ३ शाळा आदी छोटे-मोठे प्रकल्प या ठिकाणी पाहण्यासारखे आहेत.
पंडिता रमाबाई यांचे स्मृतिस्थळ
१९२२ साली पंडिता रमाबाई यांचे निधन झाल्यानंतर शेजारील शेतामध्ये त्यांचे स्मृतिस्थळ बांधण्यात आले. या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी हजारो ख्रिश्चन बांधव येत असतात.
कसे जाल?
(१)पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर सर्वात मोठे रेल्वे स्टेशन केडगाव आहे. रेल्वे स्टेशन पासून रमाबाई मुक्ती मिशन अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे.(२) पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून डावीकडे शिरूर -सातारा राष्ट्रीय महामार्गावर मुक्ती मिशन ० किलोमीटर अंतरावर आहे.
काय खाल?
पंडित रमाबाई मुक्ती मिशन परिसरामध्ये शाकाहारी व मांसाहारी २० ते २४ अदयावत हॉटेल आहेत. नाश्त्यासाठी चांगल्या हॉटेलची सोय आहे. येथील भिगवणचे मासे ,गावरान मटण, मटन रान,बिर्याणी प्रसिद्ध आहे.
मिशन केडगाव
इतिहासातील ज्येष्ठ समाजसेविका पंडिता रमाबाई यांच्या कार्यकर्तृत्वाने व पदस्पर्शाने पावन झालेले केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन हे आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. हे मिशन पाहण्यासाठी प्रतिवर्षी भारताखेरीज हजारो ख्रिश्चनबांधव पर्यटक अमेरिका, इंग्लंड ,फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अर्जेंटिना येथून येत असतात. हे मिशन केडगाव स्टेशन परिसरात १५० एकर मध्ये विस्तारलेले आहे.जीवनघडण हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.