राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील केळीच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. डिसेंबर २०२० पर्यंत झालेल्या केळीच्या ४७० कोटी रुपयांच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ३४२ कोटी रुपयांचा आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्हा केळी उत्पादनात पहिल्या क्रमाकांवर आहे.
सन २०१९-२० मध्ये देशातून १ लाख ९५ हजार ७४६ टन केळीची, ६५८ कोटी रूपयांची निर्यात झाली. त्यातला महाराष्ट्राचा वाटा १ लाख ८ हजार ९६० टनांचा, ४२८ कोटी रूपयांचा होता. केरळ (२४ हजार ७९ टन), तमिळनाडू (७ हजार ४५७) उत्तर प्रदेश (३७ हजार ४६९) कर्नाटक (१ हजार ५४६), बिहार (३ हजार १७२), गुजरात (१२७ टन), उत्तराखंड (३१० टन) या राज्यांपेक्षा महाराष्ट्र केळी उत्पादनात बराच पुढे आहे.
राज्यातील केळीचे क्षेत्र ८० हजार हेक्टर आहे. त्यातील सर्वात जास्त म्हणजे ४८ हजार हेक्टर जळगावमध्ये आहे. जी-९ (ग्रँड नाईन) या वाणाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यालाच परदेशातून सातत्याने मागणी असते. केळीच्या निर्यातीतून इतके परकीय चलन मिळत असतानाही केंद्रीय कृषी विभागाचे केळीकडे अद्याप लक्ष नाही. अँपेडा या निर्यात प्रोत्साहनासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संस्थेने द्राक्षांसाठी ग्रेपनेट, आंब्यासाठी मँगोनेट अशा नावाने संकेतस्थळे विकसित केली आहे. त्यावर नोंदणी केली की उत्पादकाला जमिनीच्या दर्जापासून प्रत्यक्ष पीक घेईपर्यंत सर्वच माहिती विनामूल्य दिली जाते. केळीसाठी मात्र अजून अँपेडाने असे संकेतस्थळ केलेले नाही.
कोट
केळीच्या निर्यातीला भरपूर वाव आहे. भारतीय केळीला जगभरातून मागणी असते. केळी उत्पादकाबरोबरच देशालाही याचा फायदा आहे. त्यामुळेच केळींच्या बागांची नोंदणी करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार