लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फळांच्या भौगोलिक मानांकनात (जीआय टॅग) देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशातील अशा मानांकित ३७० उत्पादनांपैकी ९० उत्पादने शेतमालाची असून, त्यातील २६ उत्पादने राज्यातील व त्यापैकी २० फक्त वेगवेगळ्या फळांची आहेत.
स्थानिक बाजारपेठेसह परदेशात निर्यातीसाठीही या टॅगचा उपयोग होतो. चेन्नई येथील केंद्रीय संस्थेकडून हे मानांकन मिळते. त्यासाठी उत्पादनाचा इतिहास, परिसराचा इतिहास, उत्पादनाचे वैशिष्ट्य, शास्त्रीय महत्त्व, त्यातील आरोग्यविषयक गोष्टी, गुणवत्ता असे बरेच निकष आहे. त्या कसोटीवर उतरल्यानंतर संस्थेकडून हा टॅग मिळतो. तो मिळाला की त्या उत्पादनाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वेगळी ओळख मिळते. व्यापारवृद्धीसाठी त्याचा फायदा होतो.
राज्यातील २० फळांनी आतापर्यंत असे मानांकन मिळवले आहे. देशातील अन्य कोणत्याही राज्याकडे शेती उत्पादनाची इतकी मानांकने नाहीत. त्यामुळेच राज्यातील नाशिकची द्राक्षे, रत्नागिरीचा हापूस, नागपूरची संत्री जगाच्या नकाशावर झळकली आहेत. यात नुकताच घोलवडच्या चिकूचाही समावेश झाला आहे. आता कोकणातील काळा भात व अन्य शेती उत्पादनांसाठीही हे मानांकन मिळवण्याचा प्रयत्न कृषी निर्यात कक्षाकडून सुरू आहे.
मानांकन मिळवण्यासाठी संस्थेच्या नावाने अर्ज करावा लागतो. त्याची रितसर सुनावणी, तपासणी होते. त्यानंतरच १० वर्षांसाठी म्हणून मानांकन जाहीर केले जाते. ते मिळाल्यावर त्या परिसरातील शेतकरी आपली नोंदणी करून हा जीआय टॅग लावून आपला माल विक्री करू शकतात. --//