पुणे : तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै होती. मात्र, उमेदवारांच्या आग्रहामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. तसेच फी भरण्याची अंतिम तारीख २० जुलै होती. या अंतिम तारखेपर्यंत तलाठी पदाच्या भरतीसाठी विक्रमी १२ लाख ३२ हजार ७७८ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जांची ही संख्या पाहता प्रशासनाला तब्बल २० दिवस ही परीक्षा घ्यावी लागणार आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर परीक्षेची वेळ आणि तारीख जाहीर होणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.
उमेदवारांची संख्या पाहता परीक्षेचे नियोजन करण्यात येणार असून टप्प्या-टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा फक्त २० दिवसांत होईल याचा ही नेमका अंदाज बांधता येत नाही. वीस दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा कालावधीत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. साधारण दिवसाला ५० ते ६० हजार जणांची चाचणी होईल. ही चाचणीदेखील विविध परीक्षा केंद्रांवर तीन शिफ्टमध्ये घेण्यात येईल. उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार होता; अन्यथा अर्जांची संख्या आणखी वाढली असती.
तीन आठवडे अर्ज भरण्याची मुदत :
तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर झाल्यापासून तीन आठवडे म्हणजे १७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज उमेदवारांनी करायचे होते. उमेदवारांच्या आग्रहामुळे एक दिवस अर्ज करण्यासाठी वाढवून देण्यात आला होता तसेच फी भरण्यासाठी २० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. खुल्या गटासाठी एक हजार, तर इतर गटांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते.
इंजिनिअर, डॉक्टर, वकिलांनीही केला अर्ज :
तलाठी पदासाठी अर्ज करताना पदवीधर असण्याची अट होती. मात्र, तलाठी पदासाठी पदवीधर असणाऱ्यांसोबतच उच्चशिक्षित असणाऱ्या उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. इंजिनिअर, डॉक्टर, वकील असे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचा देखील अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे तसेच पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या उमेदवारांनीदेखील अर्ज केले आहेत.