- ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : उच्च रक्तदाब हा तसा पुरुषांचा आजार समजला जाताे. परंतु, आता बदलत्या वातावरणामुळे हा आजार आता स्त्रियांसाठी अधिक त्रासदायक ठरत आहे. विशेषत: ज्या स्त्रिया नाेकरी, व्यवसाय करतात त्यांच्यात उच्च रक्तदाबाची व्याधी मोठ्या प्रमाणात आढळत आहे. राज्यात सार्वजनिक आराेग्य विभागाने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाद्वारे ४ काेटी ३९ लाख महिलांची तपासणी केली असता त्यामध्ये एक टक्का म्हणजेच ४ लाख १९ हजार स्त्रियांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे.
बदलती जीवनशैली, कामाचा अतिरिक्त ताण, त्यातून येणारा ताणतणाव, अपुरी झाेप, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे उच्च रक्तदाब स्त्रियांना जडतो. कुटुंबात पुरुष कमावता असल्याने त्याला कामानिमित्त करावी लागणारी धावपळ आणि आधुनिक जीवनशैलीमुळे त्यांच्यात हा आजार माेठ्या प्रमाणात दिसून येतो. याआधी सर्वसाधारणपणे स्त्रियांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी दिसून येत हाेते. कारण बहुतांश स्त्रियांना घरकामाची जबाबदारी हाेती. त्यामुळे फारशी धावपळ नसायची.
परंतु आता बदलत्या काळात स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. त्यांनाही सर्वच क्षेत्रात संधी उपलब्ध हाेऊ लागल्या. वाढत्या शहरीकरणात नवनवीन जाॅबची संधी निर्माण होत आहेत. मार्केटिंग, सेल्स, टेलिकाॅम आदी क्षेत्रात तर पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त प्राधान्य मिळू लागले आहे. यामुळे स्त्रियांदेखील आता पुरुषांच्या बराेबरीने खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करत आहेत. शासकीय नाेकऱ्यांपासून खासगी कंपन्यांमध्ये अगदी एक्झिक्युटिव्ह ते व्यवस्थापक, संचालक या पदावरही स्त्रिया विराजमान आहेत.
दुहेरी-तिहेरी जबाबदारी
काही स्त्रिया या कुटुंबातील स्वयंपाक, घरकाम व मुलांची जबाबदारी सांभाळून नाेकरीदेखील करतात. म्हणून त्यांच्यावर दुहेरी व तिहेरी जबाबदारी पडते. यामुळे साहजिकच कामाचा ताण वाढला आणि तारेवरची कसरत करताना त्यांच्यामध्ये रक्तदाब वाढला असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानातील माहिती
- अभियान कालावधी - ऑक्टाेबर ते डिसेंबर २०२२
- राज्यात ४ काेटी ३९ लाख स्त्रियांची तपासणी
- त्यापैकी ४ लाख १९ हजार महिलांना उच्चरक्तदाबाचे निदान
- २७ लाख ९७ हजार गराेदर स्त्रियांची तपासणी
- त्यापैकी १ लाख १८ हजार गराेदर स्त्रियांना रक्तदाबाचे निदान
स्वत:विषयी स्त्रिया अनभिज्ञ दिसून येतात. उच्च रक्तदाब हा पुरुषांचा आजार समजून स्त्रिया स्वत:ची तपासणी करत नाहीत. त्याबाबत त्यांच्यात जागृतीही नसते. त्यामुळे त्यांच्यात उच्चरक्तदाब बहुतेकदा लपलेला राहताे. रक्तदाबामुळे हृदयविकारालाही आमंत्रण मिळते. त्यासाठी स्त्रियांनी इतर तपासण्यांबराेबरच रक्तदाब तपासणी करून ताे नियंत्रणात असल्याची खात्री करावी.
- डाॅ. हेमंत काेकणे, हृदयराेगतज्ज्ञ
स्त्रियांना एका वेळेस घराची, नाेकरीची व मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यामुळे त्यांच्यामध्ये स्ट्रेस वाढलेला आहे. स्त्रिया स्वत:हून चेकअप करून घेत नाहीत. काही झाले व तपासणी केली तर त्यांच्यामध्ये याचे निदान हाेते. यामुळे ३५ वर्षांपुढील स्त्रियांनी काहीही त्रास नसला तरी वर्षातून एकदा तरी स्वत:ची रक्तदाब व इतर तपासण्या कराव्यात. पूर्वी हे प्रमाण चाळिशीनंतर असायचे.
- डाॅ. ऋता मुळे, स्त्रीराेगतज्ज्ञ, औंध जिल्हा रुग्णालय