लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कराराप्रमाणे फ्लॅटचा वेळेत ताबा न दिल्याने ग्राहकाने दिलेल्या रकमेवर घराचा ताबा देईपर्यंत ९ टक्के व्याजाने पैसे द्यावेत, असा आदेश महारेराने अमेय डेव्हलपर्सला दिला आहे. महारेराचे न्यायिक अधिकारी डब्ल्यू. के. कणभरकर यांनी हा निकाल दिला आहे.
अमेय डेव्हलपर्सचे विकसक भागीदार मंगेश देशपांडे आणि डॉ. शशिकांत घाटपांडे व इतरांच्या शिरवळ येथील प्रकल्पात फ्लॅट बुक केला होता. त्यांनी ग्राहकाकडून ७५ टक्के रक्कम घेतली. त्यानंतर तब्बल ८ वर्षानंतरही प्रकल्प पूर्ण केला नाही व ग्राहकांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्याविरोधात डॉ. ह्दयनाथ लाड आणि समीक्षा लाड यांनी अॅड. धीरज जगदाळे यांच्यामार्फत महारेराकडे तक्रार केली होती.
फ्लॅट बांधून पूर्ण ताबा देईपर्यंत ग्राहकाच्या १० लाख ६५ हजार रुपयांवर वार्षिक ९ टक्के दराने नुकसानभरपाई आणि २५ हजार रुपये तक्रार खर्च द्यावा, असा आदेश महारेराने दिला आहे. याबाबत फौजदारी खटल्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे.