पुणे : राज्यात तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा एकदा पोलीस भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. येत्या १५ जूनपासून पोलीस दलातील रिक्त जागांसाठी ही भरतीप्रक्रिया पार पडणार आहे. विविध पदांसाठी सात हजार जागा भरण्यात येतील, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी केली. पंधरा हजार जागांसाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री वळसे-पाटील यांनी भरतीप्रक्रियेची तारीख जाहीर केल्याने पोलीस खात्यात काम करण्यासाठी इच्छुक तरुणांना ही मोठी सुवर्णसंधी आहे. गृहविभागाने आतापर्यंत साडेपाच हजार जागांसाठी भरतीप्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच सात हजारांच्या भरतीप्रक्रियेला १५ जूनपासून सुरुवात होईल. पोलीस दलातील रिक्त जागांची संख्या आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आणखी १५ हजार पदे भरण्याची मागणी गृहविभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सकारात्मक असून, मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर १५ हजार जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
पोलिसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय बदल्या करण्यात येणार नाहीत. परंतु, प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक तेव्हा हा निर्णय घ्यावा लागेल. पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचा अधिकार पोलीस महासंचालकांना आहे. उपअधीक्षकपदाच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांना आहेत. भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. बदल्यांसंदर्भात पारदर्शकता पाळली जाईल, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.