- दुर्गेश मोरे
पुणे : अजित पवारांच्या एका निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या तब्बल सात आमदारांनी शरद पवार यांना सोडण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात आता राष्ट्रवादी-भाजप-शिंदे गट असे नवे समीकरण उदयास येणार आहे. याचा आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम होणार असून अजित पवारांनी एकाच मास्टर स्ट्रोकमध्ये सर्वच विरोधकांना भुईसपाट केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो अथवा सहकारी संस्था असो बहुतांश संस्थांवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. रविवारी घडलेल्या दुपारच्या राजकीय भूकंपानंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदलून गेली आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप वळसे-पाटील, दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार, दत्तात्रय भरणे, अतुल बेनके, सुनील शेळके अशा मातब्बर आमदारांनी अजित पवारांना झुकते माप दिले आहे. मुंबईत यातील वळसे-पाटील यांनी अजित पवारांबरोबर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे तळागाळातील राजकारण ढवळून निघाले आहे. आमदारांबरोबर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कल अजित पवारांकडेच असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा परिषदेला आता त्रिकूट
२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला ४२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि अपक्षांची गाेळाबेरीज करत राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली होती. सध्या जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक राजवट आहे. परंतु, आगामी निवडणुकीबाबत गेल्या काही दिवसांपासून जे आखाडे उभे केले जात होते, ते आता अजित पवारांच्या एका खेळीमुळे भुईसपाट झाले आहेत. सर्वच आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आपसूकच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्यही त्यांच्या पाठोपाठ चालू लागले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे १२ सदस्य होते. त्यातील साधारण निम्मे सदस्य हे शिंदे गटात सामील झाले आहेत, तर भाजपचे ७ सदस्य आहेत. दुसरीकडे पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुक्रमे संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने काँग्रेसचे सदस्यही स्थानिक पातळीवर अजित पवारांनाच झुकते माप देतील, अशी शक्यताही जाणकारांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील २०१७ चे विद्यमान सदस्य विचारात घेतले तर आता झेडपीत अजित पवारांची राष्ट्रवादी-भाजप-शिंदे गट असे नवे समीकरण तयार झाल्याचे स्पष्ट होते.
आगामी निवडणुकीत जागा वाटपात रस्सीखेच
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेबरोबरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. रविवारी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर सगळेच चित्र पालटून गेले आहे. अजित पवार यांनी आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. पण, जे पूर्वी विरोधक होते त्यांचे पुनर्वसन कसे होणार किंवा आता जे राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांना संधी मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत. भाजप आणि शिंदे गटातील इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जागा वाटपात रस्सीखेच होणार हे मात्र नक्की.
जिल्हा परिषदेतील २०१७ चे बलाबल
राष्ट्रवादी ४२
कॉंग्रेस ७
भाजप ७
शिवसेना १२
रासप १
अपक्ष २
लो क्रा आ १
एकूण ७२