पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटीलांनी (Jayant Patil) काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे, आता पाटील राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. यावर स्वत: जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देऊन हे वृत्त फेटाळून लावले आहे. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.
मला नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय दिसत नाही, राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जयंत पाटील काल अमित शाह यांना भेटले हे वृत्त खोट आहे. पाटील काल शरद पवार साहेब यांच्याकडे होते. आदल्या दिवशीही ते पवार यांच्याजवळच होते. या बातमीला काहीही आधार नाही, असंही अजित पवार म्हणाले. जयंत पाटील काय करणार आहेत हे ते स्वत: सांगतिलं त्यांच मला काहीही माहित नाही, आमच्या पक्षाच काम चांगल सुरू आहे. कोणत्याही आमदारावर दबाव नाही, असं स्पष्टीकरण पवार यांनी दिलं.
अमित शहांसोबतच्या भेटीवर जयंत पाटील काय म्हणाले?
आमदार जयंत पाटील म्हणाले, मी आता या चर्चांवर रोज सकाळी येऊन स्पष्टीकरण देणार नाही. रोज नव्या बातम्या समोर येत आहेत, राज्यात रोज गैरसमज पसरवले जात आहेत. मी रात्री अनिल देशमुख, राजेश टोपे,सुनिल भुसारा आम्ही रात्री दीड वाजेपर्यंत एकत्र होतो. आज सकाळी मी शरद पवार साहेबांची भेट घेतली. या भेटीत आम्ही पक्षवाढीवर चर्चा केली. माझ्याविषयी लोकांच्या गैरसमज पसरवला जात आहे, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.
"यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबतचे वृत्त फेटाळले. पाटील म्हणाले, राजकीय वर्तुळातील कोणताही गट अशा बातम्या पेरतो असं मी म्हणणार नाही.
मला नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय दिसत नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, माझ अमित शहांनी कौतुक केलं, तुम्हाला का वाईट वाटतं. माझ्यावर कोणी टीका केली मला काही वाटत नाही. आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी आपल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मला आता नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता दिसत नाही. माणसाच्या अनुभवातून वेगवेगळी मत होऊ शकतात. रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांनी मोठा निधी दिला आहे, राज्याच्या विकासासाठी मी भाजपसोबत गेलो आहे, असंही अजित पवार म्हणाले.
"देशात मोदींशिवाय मला दुसरा पर्याय दिसत नाही, राज्यातील महत्वाची काम आम्हाला करायची आहेत. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं आहे. अमित शाह यांना पुणे, नाशिक रेल्वेच आम्ही सांगितलं. त्यांनी सर्व काम घेऊन दिल्लीला येण्याच निमंत्रण दिलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.