पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेत विजयी झालेल्या भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यांचे सासर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात केंदुर हे गाव आहे. त्यामुळे केंदुरची सून राज्यमंत्री बनली, याचीच जाेरदार चर्चा रंगली आहे.राज्याच्या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना स्थान देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाने आदिती तटकरे, भाजपने पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर-साकोरे, माधुरी मिसाळ यांना संधी दिली आहे. त्यामध्ये परभणीच्या जिंतूर विधानसभेच्या आमदार भाजपच्या मेघना बोर्डीकर-साकोरे यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. मेघना यांनी पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठातून बी. एस्सी. कॉम्प्युटर आणि इंटरनॅशनल स्टडिजमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे काॅंग्रेसकडून पाच टर्म आमदार होते.मेघना बोर्डीकर यांचा विवाह केंदुर गावचे रहिवासी आयपीएस अधिकारी दीपक साकोरे यांच्याशी झाला. त्यांची दोन मुले लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत. वयाच्या २८व्या वर्षी मेघना बोर्डीकर - साकोरे यांनी सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद सदस्य ते राज्यमंत्री असा त्याचा राजकीय प्रवास राहिला आहे. परभणी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. यामध्ये पाणी आणि पर्यावरण संवर्धन, महिला आणि तरुणांसाठी रोजगार कार्यक्रम निर्माण करणे, वंचित मुलांना शिक्षण देणे आणि दारू व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन कार्यक्रम चालवणे, परभणीचा शाश्वत विकास याकडे लक्ष देणे यांचा समावेश आहे.
Maharashtra Politics : केंदुरची सून बनली राज्यमंत्री..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:39 IST