Sharad Pawar ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठं यश मिळालं. यामुळे राष्ट्रवादीतून लढण्यासाठी अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे.
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
खासदार शरद पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांची ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. यावेळी लांडगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. रवी लांडगे म्हणाले, आता विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत.मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुका ठाकरे गट महाविकास आघाडीतून लढत आहे. महाविकास आघाडीतून मी इच्छुक उमेदवार असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली. मी भोसरीत कसं काम केलं हे कळवलं. मला सहकार्य करण्याची विनंती केली. भोसरी विधानसभेवर शिवसेनेने दावा सांगितला आहे, मी प्रवेश करताना उद्धव ठाकरेंनी भोसरीवर भगवा फडकणार असल्याचे सांगितले आहे, असंही लांडगे म्हणाले.
"मी साहेबांना सांगितलं, माझा दोनवेळा मतदारसंघ फिरुन झाला आहे. जागा सोडायचा की नाही हा निर्णय साहेबांचा असणार आहे. आखाडा भोसरीचा असला तरी पैलवान कोणी असू द्या वस्ताद आमच्याकडे आहे, असंही लांडगे म्हणाले.
माढ्याचे बबन शिंदेंनी भेट घेतली
गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांची भेट घेण्यासाठी नेत्यांची गर्दी वाढली आहे. आज सकाळी माढ्याचे अजित पवार गटातील नेते बबन शिंदे यांनी भेट घेतली.या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ही भेट पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी झाली, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही पवारांची भेट घेतली.
तसेच आष्टी पाटोद्याचे राम खाडे यांनीही भेट घेतली. गेल्या दोन दिवसापासून खासदार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी नेत्यांची गर्दी वाढली आहे.