Harshvardhan Patil ( Marathi News ) : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेश सोहळा आज इंदापूरात झाला. यावेळी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी व्यासपीठावरच हर्षवर्धन पाटील यांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली.
इंदापूरातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, आजच्या कार्यक्रमाचीच गर्दीच विधानसभेचा निकाल सांगून जाते. २०१९ ला एक काळ असा होता आमच्यातून एक-एक नेते पक्ष सोडून जात होते. त्यावेळी मी राज्यात सांगत होतो, अ, ब, क गेला तरी चालेल कारण, शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. ते शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. एकदा नाही तर चारवेळा त्यांनी हे करुन दाखवले आहे. महाराष्ट्राला लढणारा नेता हवा असतो. दिल्लीवाल्यांनी जेव्हा-जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवार यांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचे काम केले, असंही जयंत पाटील म्हणाले.
"स्वाभिमानी माणस आज शरद पवार यांच्या मागे आहेत.२०१९ मध्ये हर्षवर्धन पाटील काही प्रश्नामुळे भाजपामध्ये गेले. आता ते स्वगृही परत येत होते. आधीच त्यांनी यायला हवे होते, पण आमच्या घरी जरा गर्दी होती त्यामुळे तुम्हाला येता आले नाही. आता तुम्ही येत आहात याचा आनंद आहे. पवार साहेब बहुजन समाजाचा विचार घेऊन चालत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रही त्यांच्यासोबत येत आहे, असंही पाटील म्हणाले. विधानसभा निवडणुका समोर आहेत म्हणून आता बहिणी लाडक्या झाल्या आहेत, असो टोला पाटील यांनी महायुती सरकारला लगावला.
जयंत पाटील यांनी व्यासपीठावरच उमेदवारी केली जाहीर
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. जयंत पाटील म्हणाले, इंदापूरची जागा विधानसभेला आपल्याला निवडून आणायची आहे. उद्याच्या विधानसभेला इंदापूरचं हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ हे राष्ट्रवादीत आल्यामुळे सोप्प झालं आहे. आणि हे धनुष्य त्यांनीच हातात घ्याव अशी आमची त्यांना विनंती आहे. मला महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही. त्यांचा प्रवेश करताना मी आता त्यांच्या हातात तुतारी देणार आहे, त्यामुळे इंदापूरकरांना मी वाळव्यातून येऊन काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही, असं सांगत जयंत पाटील यांनी एकप्रकारे हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे.