पुणे : राज्यातील सहकारी व खासगी अशा सुमारे २१० साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम सुरू केल्यानंतर आजपर्यंत एक हजार ३३ लाख टन उसापासून १० कोटी दाेन लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून, येत्या १५ एप्रिलपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी बंद होतील, अशी अपेक्षा साखर आयुक्तालयाला आहे.
राज्यात २० मार्चअखेर १० कोटी ३३ लाख ९८ हजार टन उसाचे गाळप झाले असून, १०२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा साखर उतारा ९.९५ इतका मिळाला असून मागील वर्षी हाच साखर उतारा १०.४० टक्के होता. मागील दोन-तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे ऊस उत्पादनात घट होऊन राज्याचा साखर उतारा घटल्याचा अंदाज साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे यंदा एकूण ऊस उत्पादनात २५ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सहकारी साखर कारखान्यातील गाळप आणि साखर उत्पादन कारखान्यांची संख्या : १०५
दैनंदिन गाळप (टन) : चार लाख ५८ हजार ५०
मार्चपर्यंत उसाचे गाळप - पाच कोटी ५० लाख ७३ हजार ७८० मे. टन
मार्चपर्यंतचे साखरेचे उत्पादन - पाच कोटी ७१ लाख ६८ हजार २७० क्विंटल
साखर उतारा - १०.३८ टक्के
चाैकट : खासगी साखर कारखान्यातील गाळप आणि साखर उत्पादन
संख्या - १०५
दैनंदिन गाळप टन - चार लाख २४ हजार ५००
मार्चपर्यंत उसाचे गाळप - चार कोटी ७८ लाख ६४ हजार ४१७ मे. टन
मार्चपर्यंतचे साखरेचे उत्पादन - चार कोटी ५४ लाख ९४ हजार ५९५ क्विंटल
साखर उतारा - ९.५० टक्के
अद्याप १२० लाख टन उसाचे गाळप शिल्लक
राज्यात आतापर्यंत ११९ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. तर ९१ कारखाने अद्याप सुरू असून सर्वाधिक कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर विभागातील कारखाने सुरू असल्याची माहिती आयुक्तालयाकडून देण्यात आली. राज्यात अद्याप १२० लाख टन उसाचे गाळप शिल्लक आहे.
राज्यातील साखर हंगाम १५ एप्रिलपर्यंत संपेल, अशी अपेक्षा आहे. देशात एकूण उत्पादनाच्या ६० लाख टन साखर निर्यात झाली आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा २१ लाख टन इतका आहे.
- शेखर गायकवाड, आयुक्त, साखर