पुणे : पुण्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, आज (दि.३०) हा कमाल तापमानाचा पारा चाळीशीत आला आहे. तर किमान तापमानाचा पाराही तिशीच्या जवळ जात आहे. शिवाजीनगरला २२.५ आणि वडगावशेरी, मगरपट्टा या ठिकाणी हा पारा २७ अंश सेल्सिअसच्या वर पोचला आहे. पण ढगाळ वातावरणामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. आज पुण्यातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
एकेकाळी हिल स्टेशन असलेले पुणे आता चांगलेच तापू लागले आहे. अजून तर उन्हाळ्याचे दोन महिने राहिले आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्याचे किमान तापमान चाळीशी पार जाण्याची शक्यता आहे. आता विदर्भातील सर्वच शहरांचे किमान तापमान हे चाळीशच्या पुढे गेले आहे.
महाराष्ट्रावर कोरड्या आणि आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे विदर्भातील आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. गोंदिया, वर्धा, अमरावती, भंडारा, नागपूर या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, तर पुण्यातही हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दिवसा तर उष्णता आहेच, पण रात्री देखील राहील, असाही इशारा देण्यात आला आहे.