पुणे : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांची दारे पुन्हा एकदा खुली होणार असून, पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे ७ लाख ६३ हजार ३६५ विद्यार्थी येत्या १ डिसेंबरपासून शाळेत जाऊ शकतील, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. परिणामी ऑनलाईन शिक्षणामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान आता थांबणार आहे. मात्र, शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक नियमावली प्रसिद्ध करावी. तसेच इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाकडून केली जात आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग तर शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ५० टक्के क्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले. त्यात आता इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना नियमांचे पालन करून सध्या ऑफलाईन शाळा भरविल्या जात आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळांमध्ये कोणताही अनुचित प्रकार झाल्याचे समोर आले नाही. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहेत.
पुणे जिल्ह्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४ हजार २१० शाळा असून १ हजार ३४६ शासकीय अनुदानित शाळा आहेत; तर जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित शाळांची संख्या १ हजार ८९९ असून जिल्ह्यात एकूण ७ हजार ४५५ शाळा आहेत. या शाळांमधील सर्वच विद्यार्थी आता शाळेत येऊ शकणार आहेत. सध्या अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक पालक ऑफलाईन शाळा केव्हा सुरू होते याची वाट पाहत आहेत.
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करावी
''शाळा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, राज्य शासनाने आता इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळांमधील उपस्थितीमध्ये वाढ करावी. तसेच पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करावी असे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांनी सांगितले''
पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार
''दीड वर्षाहून अधिक कालावधीपासून विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी शाळेत येण्यास उत्सुक आहेत. पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाचे शिक्षकांकडून स्वागतच केले जात असल्याचे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नारायण शिंदे यांनी सांगितले.''
जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या
पहिली : १,९०,०६१दुसरी : १,९२,५९२तिसरी : १,९०,१३७चौथी : १,९०,५७५पाचवी : १,८६,९९६सहावी : १,८३,२१४सातवी : १,७७,८७३आठवी : १,७०,८८२नववी : १,६७,८६२दहावी : १,४४,३८४अकरावी : १,२३,०४३बारावी : १,१८,२४८