पुणे : डोळ्यांच्या साथीने सध्या अख्खा महाराष्ट्र हैराण झाला असून, एकट्या पुणे शहरात तब्बल साडेचार हजार नागरिकांचे डोळे आले असल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. दरम्यान, डोळे आलेले अनेक रुग्ण परस्पर मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेतात तसेच अनेक जण खाजगी क्लिनिकमध्ये जाऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरात डोळे आलेल्यांची संख्या साडेचार हजारांपेक्षाही अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डोळे येण्याचे प्रमाण शहरात दिवसेंदिवस वाढत असून, खबरदारी म्हणून महापालिकेने मंगळवारी महापालिकेच्या सर्व दवाखान्यांत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ३ हजार ड्रॉप पाठविले आहेत. डोळे आल्यावर नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेऊ नयेत. अनेक नागरिक जुन्या पद्धतीने मेडिकलमधून ‘लिंबोळ्या’ टाकून घरगुती उपाय करीत आहेत. पण, हे योग्य नसून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळे तपासणी करून औषधे घेणे आवश्यक असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
शहरातील १७७ शाळांमध्ये तपासणी; १,३९९ विद्यार्थी बाधित
महापालिकेच्या आरोग्य विभागाने १ ऑगस्टपासून आजपर्यंत शहरातील १७७ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी केली आहे. यामध्ये १ हजार ३९९ विद्यार्थ्यांना डोळे आल्याचे आढळून आले. महापालिकेच्या अथवा खाजगी शाळेत एका वर्गात ४० ते ५० विद्यार्थी असतात. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शाळांमध्ये अधिक लक्ष केंद्रित केले आहे. डोळे आल्यावर डोळ्यांना हात लावणे, एकत्र खेळणे, एकमेकांच्या वस्तू वापरल्या जाणे हे प्रमाण शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. परिणामी, डोळे येण्याची साथ वाढू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. - डॉ. सूर्यकांत देवकर सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.
डोळे येऊ नये म्हणून घ्यावी ही घ्यावी काळजी
डोळे येणे हा काही गंभीर आजार नाही. परंतु डोळे आल्यावर किमान तुमचा एक आठवडा वाया जातो. त्यामुळे डोळे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये.डोळे लाल होणे, चिकट पाणी डोळ्यांतून येणे, पापण्यांना सूज येणे ही डोळे येण्याची लक्षणे आहेत. अशावेळी वारंवार हात धुणे, डोळ्यांना सारखा हात न लावणे, डोळे आलेल्या व्यक्तीचे टॉवेल, रुमाल वापरू नये. - डॉ. बबन साळवे, बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन
डोळे आल्यावर ही घ्या काळजी
- वैयक्तिक स्वच्छता ठेवणे.- वारंवार हात धुणे.- वारंवार डोळ्यांना हात न लावणे.- डोळे आलेल्या व्यक्तीने इतरांच्या संपर्कात न येणे.- घरातच विलगीकरणात राहणे.- परिसर स्वच्छ ठेवून माश्या, चिलटांचे प्रमाण कमी करणे.