लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ड्रग्ज रॅकेट उघडकीस येऊन 11 दिवस उलटल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाला आता जाग आली आहे. ससून रुग्णालयातील ड्रग्ज आणि सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची चौकशी समिती नेमली आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी याबाबतचे आदेश बुधवारी रात्री उशिरा काढले. तसेच येत्या १५ दिवसांत हा अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील ससून रुग्णालयात उघडकीस आलेल्या ड्रग्स रॅकेट आणि कैद्यांना दिल्या जाणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील अद्याप फरार आहे. राज्य शासनाने आता या प्रकरणाची संपूर्ण तपासणी करण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण आणि त्यासंबधीत घटनेबाबत सविस्तर चौकशी करणार असून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.
त्रयस्थ समिती हवी
दरम्यान या समिती मधील अध्यक्ष ते सदस्य सर्वजण वैद्यकीय शिक्षण विभागातील आहेत. त्यामुळे निष्पक्ष चौकशी आणि कारवाई होण्याची शक्यता खूप कमी असल्याचे या क्षेत्रातील सूत्रांचे मत आहे.
अशी असेल समिती
१) अध्यक्ष - डॉ. दिलीप म्हैसेकर, (संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई)२) सदस्य - डॉ. सुधीर देशमुख, (अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर)३) सदस्य - डॉ. हेमंत गोडबोले, प्राध्यापक व विभागप्रमुख, न्यायवैद्यक शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड)४) सदस्य - डॉ. एकनाथ पवार, प्राध्यापक व विभागप्रमुख, अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई)