पुणे : राज्यामध्ये किमान व कमाल तापमानात चढउतार होत असून, मंगळवारी जळगावात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे जळगावकर गारठून गेले. पुणे शहरामध्ये कमाल ३१.२ आणि किमान तापमान १६.४ नोंदले गेले. दिवसभर देखील हवेत गारठा जाणवत आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
सकाळी हवेतील गारठा वाढत असल्याने हुडहुडी भरू लागली आहे. राज्यातील छ. संभाजीनगर, यवतमाळ येथे किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर सर्वाधिक कमाल तापमान सांताक्रूज ३६.३ अंश सेल्सिअस होते. पुणे, नाशिक, महाबळेश्वर या ठिकाणी देखील किमान तापमानात घट होत आहे. येथील तापमान १६ अंशावर नोंदवले गेले. पुणेकर आता पहाटे फिरायला जाताना स्वेटर घालत असून, हळूहळू थंडी जाणवू लागली आहे. ऑक्टोबर हीट आता पूर्णपणे संपली असून, गारठा वाढू लागला आहे.