पुणे : गेले तीन महिने सलग कोसळत असलेला पाऊस आणि आता शेतकऱ्यांसह सामान्यांनाही नकोसा झालेल्या मान्सूनने शुक्रवारपासून (दि. १४) राज्यातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्याच्या उत्तर भागातून मान्सून परतला असून, येत्या तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांतून मान्सून परतेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. तब्बल १० दिवस मान्सून उशिराने राज्यातून परतला आहे. मात्र, पुढील तीन दिवस कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, शेतीपिकांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील महत्त्वाचे व सर्वाधिक क्षेत्रावर असेलेले सोयाबीन पीक गेल्या पंधरवड्यापासून काढण्याची प्रतीक्षेत आहे. मात्र, सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या पिकाची काढणी होऊ शकली नाही. आणखी काही दिवस पाऊस राहिल्यास हे पीक शेतातच सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा पाऊस थांबावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
त्यानुसार भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतल्याचे शुक्रवारी जाहीर केले. येत्या ३ दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांतून मान्सून बाहेर पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. परतीच्या मान्सूनची ही सीमा रकसौल (बिहार), डाल्टनगंज (झारखंड), पेंद्रा रोड (छत्तीसगड), छिंदवाडा (मध्य प्रदेश) व महाराष्ट्रातील जळगाव आणि डहाणू येथून जात आहे. या भागातील पाऊस आता थांबला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा वेळेत अर्थात २० सप्टेंबरला सुरू झाल्यानंतर अनेक दिवस तो राजस्थानातच रेंगाळला. राज्यातूनही मान्सून परतण्याची सरासरी तारीख ५ ऑक्टोबर असून, तब्बल १० दिवसांनी त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सरासरीच्या वेळेनुसार आणखी पाच दिवसांत तो सबंध राज्यातून परतायला हवा.
पुढील दोन दिवस पाऊस
सध्या बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच अरबी समुद्रावरही असेच क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.