पुणे :महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात अन्न, धान्याची तूट नसून वैद्यकीय व्यवस्था उत्तम काम करत असल्याचा विश्वास ज्याचे कृषी, सहकार, अन्न व नागरी पुरवठा राज्य मंत्रीविश्वजीत कदम यांनी व्यक्त केला . पुण्यात त्यांनी गुरुवारी काही शिवभोजन केंद्रं व स्वस्त धान्य दुकानांना भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी सारख्या योजनेचा आधार आहे. राज्य सरकारने सध्या शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपयांवर आणली आहे. स्वस्त धान्यही केवळ ठराविक कुटुंबांना न देता सर्वांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. याच मुद्द्यांवर कदम यांनी भाष्य केले.
ते म्हणाले की, 'पुण्यातील शिवभोजन थाळीच्या केंद्रांची स्थितीसमाधानकारक आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना चांगलं जेवण उपलब्ध व्हावं हीच सरकारची इच्छा आहे. महाराष्ट्रात कुठेही अन्न धान्याची तूट नाही. काही ठिकाणीं धान्य उपलब्ध आहे तर काही ठिकाणी होईल मात्र तुटवडा कुठेही नाही. महाराष्ट्रात वैद्यकीय सुविधा व्यवस्थित आहे, डॉक्टर, नर्सेस उत्तम काम करत आहे. थोडा त्रास होईल पण लोकांची कुठेही गैरसोय होणार नाही असा आमचा प्रयत्न आहे.
लॉकडाऊनबाबत १२ तारखेला आढावा घेऊ
लॉकडाऊन वाढवण्याच्या मुद्दयावरही त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, '१२ तारखेला आढावा घेतला जाईल. त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची मते जाणून घेतली जातील. मात्र कमोडिटी स्प्रेड होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाईल. काही जिल्ह्यांमध्ये सुदैवाने एकही रुग्ण नाही. तिथे लॉकडाऊन वाढवायचा का असाही प्रश्न आहे. या सगळ्याचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल'.