पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये माेठी गारपीट झाली. या गारपिटीने तब्बल ७५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यातील सुमारे १८ हजारांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घासही अवकाळीने हिसकावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलेच झोडपून काढले असून, हाताशी आलेल्या रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. राज्यातील नाशिक, धुळे, जळगाव, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी व गारपिटीने रबी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. यात गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, केळी या पिकांचा समावेश आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात १८ हजार ८७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अकोल्यातही १७ हजार ६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात ११ हजार ९५ हेक्टरवरील रबी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा - तालुके - बाधित क्षेत्र (हेक्टर)
नाशिक-नांदगाव- ५४
धुळे-धुळे- २२०
जळगाव-चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, भडगाव, धरणगाव- १८,८७६
जालना- जाफ्राबाद, भोकरदन- ११,०९५
अकोला- मूर्तिजापूर, तेल्हारा- १७,०६९
अमरावती- धारणी, चिखलदरा- २,२७८
बुलढाणा- बुलढाणा, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा- २१,७६८
वाशिम- तीन तालुके- ३,०१४
यवतमाळ- १ तालुका- ४५०
एकूण- ७४,८२४