Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार निवडणूक लढत आहेत. खासदार शरद पवार यांनीही बारामतीमध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गावभेट दौरे वाढवले आहेत. दरम्यान, महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यावरुन अजित पवार यांनी मोठं विधान केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील गावभेटी दरम्यान बोलताना मोठं विधान केले, अजित पवार म्हणाले, मित्रांनो तुम्हाला काहींना वाटत असेल की अजित पवारांनी आता शरद पवार यांना सोडायला नको होतं. मित्रांनो मी शरद पवारांना सोडलेलं नाही, मी त्यांना सांगत होतो की सगळ्या आमदारांचं मत सरकारमध्ये जाण्याचं आहे. हे मत माझं एकट्याचं नव्हतं, सगळ्या आमदारांचं मत होतं. सगळ्या आमदारांच्या त्या पत्रावर सह्या होत्या. कामाला स्टे आला होता त्यामुळे सरकारमध्ये जाण्याचे सगळ्यांचं मत होते, असं मोठं विधान अजित पवार यांनी आज केले.
"आपण मंजूर केलेल्या कामाला स्टे आला. २५/१५ मधील कामांनाही त्यांनी स्टे दिला. मी त्यावेळी विरोधी पक्षात होतो, त्यावेळी त्या सरकारने कामांना स्टे दिला होता. पैसे पाठवून परत स्टे दिल्यामुळे लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं असते, असंही अजित पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसारख करु नका- पवार
"लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चांगला झटका दिलात, जोर का झटका धिरेसे लगा, आता तसं काही करु नका. गावच्या पुढाऱ्याचा राग माझ्यावर काढू नका. ते चुकीचे वागले म्हणून अजित पवारांनाच दणका द्यायचा, असं काही करु नका. ते उभे राहिल्यावर त्यांना दणका द्या, असंही अजित पवार म्हणाले. अजून उद्याच्या सभेत कोण काही बोलतील मला माहित नाही. भावनिक होऊ नका, असंही अजित पवार म्हणाले.