Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी मोठी लढत सुरू आहे. दोन्ही बाजूंनी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. दरम्यान, बारामतीमधून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास खासदार शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व नात रेवती सुळे यांना अडवण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. जवळपास अर्धा तास त्यांना गेटवरच अडवल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आज प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे बारामती येथील टेक्सटाइल पार्कमध्ये जात होत्या. यावेळी त्यांना गेटवरच थांबवून ठेवण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
टेक्सटाईल पार्कच्या गेटवर जवळपास अर्धा तास थांबवण्यात आले. अर्ध्या तासाने सुरक्षारक्षकाने गेट उघडले. प्रतिभा पवार आणि रेवती सुळे अर्धा तास गेटवर थांबल्या होत्या, गेटवर अडवण्याचे कारण अजूनही समोर आलेले नाही.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रतिभा पवार सुरक्षा रक्षकाला प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहेत.'तुम्ही आम्हाला पाहून गेट बंद का केलं? गेट बंद करण्यासाठी कोणी सांगितलं. तुम्हाला कोणाचा फोन आला? आतमधील दुकाने बंद आहेत का? आमची गाडी आल्यावर गेट बंद केलं का? आम्ही चोरी करण्यासाठी आलेलो नाही, आम्हाला शॉपिंग करायची आहे, असं त्या व्हिडीओमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विधानसभा निवडणुका पहिल्यांदा होत आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होत आहे. ही लढत म्हणजे अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच आहे, खासदार शरद पवार यांनी बारामतीमध्ये जोरदार प्रचाराला सुरूवात केली. पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही प्रचार सुरू केला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गांवाना भेटी देत प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, आता उद्या प्रचाराची सांगता सभा होणार आहेत, या सभेत शरद पवार बारामतीमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.