"चाकणकरांच्या बाबतीत तत्परता दाखवली, मग माझ्याबाबतीत का..."; अजित पवार गटातील नेत्याची उघड नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 02:53 PM2024-10-16T14:53:18+5:302024-10-16T14:54:12+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काल राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी जाहीर झाली, महायुतीने सात नेत्यांना आमदारकीची संधी दिली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी कालपासून सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने काल विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. काल महायुतीने राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या नावांची घोषणा केली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, आता यावरुन राष्ट्रवादी पक्षात नाराजीनाट्य सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे, राष्ट्रवादी पुणे शहरचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी आज उघड नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपाल नियुक्त आमदार यादी समोर आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, यासाठी ६०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी त्यांनी सामुहिक राजीनामा दिली. तसेच माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी पक्षावर उघड उघड नाराजी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर राष्ट्रवादी पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मानकर म्हणाले, मी आतापर्यंत पुणे शहरअध्यक्षपदाच काम केलं आहे. काही दिवसापूर्वी राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत चर्चा सुरू झाली. यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी माझ्या नावाची मागणी केली. दादांनी त्यावेळी ही जबाबदारी माझी असल्याचा शब्द दिला. हे सगळं होतं असताना आता अचानक दोन नाव समोर आली. माझ नाव यात का आले नाही? मी मेरीटमध्ये कुठे कमी पडलो? हे मला नेत्यांना विचारयचं आहे. त्यांनी कोणतीही चर्चा न करता नाव जाहीर केली. मला नाकारायचं कारण काय?, असा सवालही दीपक मानकर यांनी केला.
"मला कोणत्याही पुढाऱ्यासमोर गाऱ्हाणी मांडण्याची सवय नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी काल स्वत:हून राजीनामे दिले आहेत. मी दादांबरोबर नेहमी राहणार. मी पदाचा राजीनामा देणार आहे. यापुढे कार्यकर्ता म्हणून करणार आहे. एवढं काम करुनही जर नेत्यांना आपली किंमत नसेल तर आपणही कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे, असंही मानकर म्हणाले.
'आम्हाला फोन करायचीही तत्परता दाखवली नाही'
"एवढी तत्परता जर आमचे अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे आहे की, रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष पहिलं पद त्यांचं जाहीर केलं. त्यांच्यानंतर विधान परिषदेची यादी जाहीर केली. मग तुम्ही तेवढी तत्परता आमच्यासाठी का दाखवली नाही? असा सवालही मानकर यांनी केला. तुम्ही आम्हाला फोन करायचीही तत्परता दाखवली नाही. तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना विचारायला तरी पाहिजे. संघटना चालवायची असेल तर कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे. कार्यकर्त्यांना संघटनेत कधी न्याय मिळणार आहे. छगन भुजबळ यांच्याकडेच सगळच देणार असाल तर तुमच्या कार्यकर्त्यांना कधी ताकद देणार, ताकद दिली नाही तर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते, असंही दीपक मानकर म्हणाले.