Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:05 PM2024-10-30T22:05:03+5:302024-10-30T22:10:31+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: खासदार शरद पवार यांनी बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ): बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार निवडणूक लढत आहेत. कालपासून युगेंद्र पवार यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. तर दुसरीकडे आता खासदार शरद पवार स्वत: युगेंद्र पवार यांच्यासाठी मैदानात उतरले असल्याचे दिसत आहे. आज शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यासह भेटी-गाठी वाढवल्या आहेत.
आजपासूनच शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. आज पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रकांत तावरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवारही उपस्थित होते. बारामती विधासभेसाठी ही भेट महत्वाची मानली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
चंद्रकांत तावरे हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
बारामती तालुक्यातील सांगवी गावात चंद्रराव तावरे यांच्या राहत्या घरी शरद पवारांनी ही भेट घेतली. यावेळी उमेदवार युगेंद्र पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी चंद्रराव तावरे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे सांगितले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातील जु्न्या सहकाऱ्यांच्या भेटी घ्यायला शरद पवार यांनी सुरुवात केली आहे. यामुळे आता बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांनी स्वत: मोर्चे बांधणीला सुरूवात केल्याचे दिसत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
कन्हेरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, कुटुंबातील वडीलधारी म्हणून माझ्या कुटुंबात माझे सगळे ऐकतात. मी राजकारण करत असताना अन्य भावांना शेती, उद्योग धद्यांसाठी मदत केली. त्यांच्या आशीर्वादानेच मी आजवर राजकारण करू शकलो. मी राज्य चालवायची जबाबदारी घेत सगळा कारभार त्यांच्या हाती दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मी होतो, मात्र नव्या पिढीकडे सगळे अधिकार दिले. गेली २० वर्षे मी बारामतीत लक्ष घातलेले नाही.
चारवेळा उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली. तरी त्यांनी पहाटे सहालाच तिकडे जात शपथ घेतली. अनेकांना झोपेतून उठवून तिकडे नेले. परिणाम काय झाला, अवघ्या चार दिवसांत पद गेले. नंतरच्या काळात तर पक्षच घेऊन दुसरीकडे जाऊन बसले. त्यातून त्यांना पद मिळाले. पण याआधीसुद्धा मिळाले होतेच ना, असे शरद पवार म्हणाले. मी राज्यात आजवर अनेकांना मंत्री केले. उपमुख्यमंत्री केले. परंतु, एकदाही सुप्रियाला पद दिले नाही. बाकीच्यांना वेगवेगळी पदे दिली. बारामतीत ‘मलिदा गँग’चा वारंवार उल्लेख होतो आहे. पण मी अशा गँग कधीही निर्माण केल्या नाहीत, असा टोलादेखील शरद पवार यांनी यावेळी अजित पवार
यांना लगावला.