पुणे : ‘कोळशाची अडचण आहे, पण कोणत्याही स्थितीत राज्य अंधारात जाऊ देणार नाही’, असे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
काँग्रेस भवनमध्ये शनिवारी (दि. २५) ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सगळ्या चुका गेल्या वेळच्या भाजपा सरकारच्या आहेत. त्यांचे माजी मंत्री आता ‘मिस मॅनेजमेंट’ म्हणून आमच्यावर टीका करत असतील, पण खरे ‘मिस मॅनेजमेंट’ त्यांचेच होते. त्यांनी सरकारी संस्था, ग्रामपंचायतींकडून थकीत वीज बिलांची वसुलीच केली नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे’.
‘कोळसा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण अतिवृष्टी, मागणी वाढल्याने शिल्लक साठा संपला. यात दोष केंद्र सरकारचाही नाही. पावसाने कोळसा कमी झाला. तरीही आम्ही शोध घेत आहेत. विलासपूर महानदी प्रकल्पात कोळसा असल्याचे समजल्याने अधिकारी तिकडे गेले आहेत, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. आर्थिक अडचणी असल्याचे मान्य करून ते म्हणाले की, महानिर्मितीला कोळसा खरेदीसाठी महावितरणकडून पैसे मिळतात. महावितरणची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांनी थकीत वीजबिले त्वरित भरावीत.