पुणे : कुंपणच शेत खातं ही म्हण पुणेपोलिसांच्या बाबतीत खरी ठरावी असं वृत्त आहे. अपघात झालेली दुचाकी पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर गाडीच्या डिक्कीमधील 50 हजार हजार रुपये चोरल्याची घटना घडली आहे. पण सीसीटीव्हीमुळे हा प्रकार उघडकीस आला. तळेगाव पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. एमबीएची विद्यार्थिनी प्रणिता नंदकिशोर बेंद्रे हिने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
गुरूवारी(दि.1) दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रणिता नंदकिशोर बेंद्रे ही वडिलांसोबत बँकेत पैसे भरण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गाने मोटरसायकलवरून जात होती. तळेगाव पोलीस ठाण्यासमोरच समोरून येणा-या दुचाकीसोबत त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यात प्रणिता आणि तिचे वडील जखमी झाले. तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने तातडीने त्यांची मदत केली. पोलिसनामा डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, तिची अॅक्टिव्हा गाडी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी उपचारासाठी त्यांना रूग्णालयात नेले. पण, संध्याकाळी रुग्णालयातून परतली असता प्रणिताची बॅग गायब झाली होती. तरुणीच्या बॅगमधील 50 हजार रुपये चोरल्याचं उघड झालं.
याबाबत प्रणिताने पोलिसांना विचारणा केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि मदत करणा-या स्वाती जाधव या महिला पोलिसानेच पैसे चोरल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.
(प्रतिकात्मक फोटो वापरण्यात आला आहे )