लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथे झालेल्या रौप्य महोत्सवी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्यांचा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी) तर्फे सत्कार करण्यात आला.
एमआयटी आणि पनवेल महापालिकेच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सायकल खेळाडूंच्या संघाने अप्रतिम प्रदर्शन करून या वर्षाचे अजिंक्यपद खेचून आणले. पनवेल येथे आयोजित या स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धेकांनी अप्रतिम कामगिरी केली. यात सूर्या थत्तू, प्रणिता सोमण, अदीप वाघ, प्रियंका कारंडे व इतर खेळाडूंनी यश संपादन केले. या स्पर्धेत एकूण २६ राज्यातील १ हजारपेक्षा अधिक स्पर्धेक सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रातील संघाने ४२ गुण घेऊन सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. यात ४ सुवर्ण पदक, २ रौप्य पदक आणि ५ कास्य पदक मिळाले.
एमआयटीतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे संघटनेचे सचिव प्रताप जाधव, ‘एमआयटी’चे कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, सीईओ प्रविण पाटील आणि क्रीडा संचालक डॉ. पी.जी. धनवे यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. प्रताप जाधव म्हणाले, “भविष्यात ऑलिम्पीकमध्ये या खेळाडूंना पोहचण्यासाठी अकादमी सुरू करण्यात येणार आहे.” प्रविण पाटील म्हणाले की, खेळाडूंना केंद्रबिंदू मानून त्यांना पाठींबा द्यावा लागेल. डॉ. प्रशांत दवे म्हणाले, “शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकलिंग आणि वॉकिंग या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.”