पुणे :पुणे शहरात आणि राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा (येलो अलर्ट) इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधूदुर्गचा समावेश आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्येही राज्यामध्ये पाऊस पडेल, असाही अंदाज देण्यात आला आहे.
राज्यामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. विदर्भामधील सर्व जिल्ह्यांचे तापमान चाळीशी पार पोचले आहे. असे असतानाच राज्यात वादळी पावसाचाही फटका बसणार आहे. कमाल तापमानाचा पारा अनेक ठिकाणी ४० ते ४३ अंशांवर नोंदले गेले आहे. शनिवारी (दि.२०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा (येलो अलर्ट) इशारा वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यात तापमान चाळीशीच्या खाली आले आहे. शनिवारी सकाळी हवेत गारवा असल्याने पुणेकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. ढगाळ वातावरणामुळे उन्हापासून काहीशी विश्रांती मिळाली. पण आज सायंकाळी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.