'महायुतीमुळे महाराष्ट्राची अधोगती, राज्यावर कर्जाचा बोजा' जयंत पाटलांचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 02:15 PM2024-11-16T14:15:20+5:302024-11-16T14:26:38+5:30
शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने राज्याच्या तिजोरीचे दारे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरू केला. जयंत पाटील यांची केली युती सरकारवर टीका
पुणे : "लोकसभेत फटका बसल्यानेच शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने राज्याच्या तिजोरीचे दारे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरू केला. सगळेच लाडके असल्याचे सांगत प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी केली. राज्यावर लाखो कोटींचे कर्ज केले आहे. मात्र, हे लोक २० नोव्हेंबरपर्यंतच लाडक्या बहिणी म्हणणार आहेत. त्यानंतर त्या लाडक्या राहणार नाहीत.' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युती सरकारवर टीका केली.
सल्लागारांच्या भरवशावर हे राज्यकर्ते काम करत आहेत. मागच्या अडीच वर्षांत महायुती सरकारने महागाई दिली. जीएसटीचा बोजा लादला. समस्यांचा डोंगर उभा केला. कराच्या माध्यमातून वर्षाला तुमच्याकडून लाखभर रुपये वसूल करून वर्षाकाठी तुम्हाला सात-आठ हजार रुपये देतात आणि स्वतःचा ऊर बडवून घेताहेत, हे दुर्दैवी आहे. असा आरोपही त्यांनी लगावला.
हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ केशवनगरमधील झेड कॉर्नर येथे आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, "मतदारसंघात तीनशे कोटी आणल्याचे विद्यमान आमदार म्हणतात, पण त्यातून काम तर काहीच दिसत नाही. मग हे पैसे गेले कुठे? याचा जाब जनतेने विचारावा. गेल्या पाच वर्षांत शहराला न्याय देऊ शकले नाहीत. ज्यांनी सर्वकाही दिले, त्यांच्या वयावर टीका करीत गद्दारी केली. शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांच्या मांडीवर जाऊन ते बसलेत. म्हणून निष्ठेने काम करणाऱ्या प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे."