चिंताजनक! पुण्यात आढळला महाराष्ट्रातील पहिला 'झिका'चा रुग्ण; ५० वर्षाच्या महिलेला झिका विषाणूची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 10:25 PM2021-07-31T22:25:04+5:302021-07-31T22:26:18+5:30

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथील आरोग्य केंद्रात झिका विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे.

Maharashtra's first 'Zika' patient found in Pune; 50-year-old women infected with Zika virus | चिंताजनक! पुण्यात आढळला महाराष्ट्रातील पहिला 'झिका'चा रुग्ण; ५० वर्षाच्या महिलेला झिका विषाणूची बाधा

चिंताजनक! पुण्यात आढळला महाराष्ट्रातील पहिला 'झिका'चा रुग्ण; ५० वर्षाच्या महिलेला झिका विषाणूची बाधा

Next

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथील आरोग्य केंद्रात झिका विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. हा महाराष्ट्रातील पहिला झिका विषाणूची लागण झालेला रुग्ण आहे. बेलसरमध्ये गेल्या महिन्याभरात तापाचे रुग्ण आढळून येत होते. तेथील ४१ जणांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २५ जणांना चिकनगुनिया तर ३ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून बेलसर एका ५० वर्षाच्या महिलेस झिका विषाणूची बाधा झाल्याचा निष्कर्ष ३० जुलै रोजी प्रयोगशाळेने दिला आहे.

सुरुवातीला बेलसरमधील पाच रुग्णांचे नमुने १६ जुलै  रोजी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे तपासण्यासाठी पाठविले असता त्यापैकी तीन जणांना चिकनगुनिया आजाराचे निदान झाले. २७ ते २९ जुलै या कालावधीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या डेंग्यू चिकनगुनिया विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील चमूने बेलसर आणि परिंचे या भागात भेट देऊन सुमारे ४१ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित केले. त्यामध्ये महिलेला झिका विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. महिला चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे. महिला सध्या पूर्णपणे बरी झालेली असून कोणतीही लक्षणे नाहीत. तिच्या घरामध्येही कोणाला लक्षणे नाहीत.

३१ जुलै रोजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, सहाय्यक संचालक डॉ. कमलापुरकर,  राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप या राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पथकाने सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी आणि पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना या भागात झिका रुग्ण आढळल्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. झिका रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर बेलसर गाव आणि परिसरात राज्य शीघ्र प्रतिसाद पथकाच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे.

-----

• झिका रुग्णाच्या पाच किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात येणाऱ्या आजूबाजूच्या एकूण सात गावांमध्ये घरोघरी भेटी देऊन ताप रुग्णांचे सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली असून त्या संदर्भातील सूक्ष्म नियोजन करून येत्या तीन दिवसात या सर्व गावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे.

• झिका हा आजार डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराप्रमाणे एडीस इजिप्ती या डासांमुळे पसरतो. याकरता बाधित क्षेत्रांमध्ये डास अळी घनता सर्वेक्षण करून योग्य कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सांगण्यात आले असून कीटकशास्त्र सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणात लोकसहभाग घेण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येत आहेत.

• एकात्मिक कीटक व्यवस्थापन बाधित भागातील डासोत्पत्ती नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याची डबकी बुजवणे, वाहती करणे, योग्य ठिकाणी गप्पी मासे सोडणे तसेच घरगुतीसाठवलेल्या पाण्यामध्ये अळीनाशकाचा वापर करणे, बाधित भागात धुरळणी करणे इत्यादी कृती योजना सुरु करण्यात आल्या आहेत.

• गरोदर मातांची यादी करुन त्यांचे विशेष सर्वेक्षण करणे, भागातील मायक्रोसिफाली, गर्भपात आणि जन्मतः होणा-या मृत्यूंचे सर्वेक्षण करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले आहे. 

• बेलसर गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करणे- सध्या या गावात तीन दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पाणी साठवण्याची गरज पडल्याने डासोत्पत्तीस हातभार लागला आहे. अनेक घरांसमोर जमीनीखालील पाण्याच्या टाक्या आहेत. या करिता गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

• आरोग्य शिक्षण कीटकजन्य आजार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी विविध माध्यमातून जनतेचे प्रबोधन करण्यात येते आहे. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोविड सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना अवगत करण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra's first 'Zika' patient found in Pune; 50-year-old women infected with Zika virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.