लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनतर्फे आयोजित ३४व्या सबज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविताना २४७ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या उत्कर्ष गौरने ५ तर संजिती साहा व वेदिका अमिन यांनी प्रत्येकी ४ सुवर्णपदके जिंकत स्पर्धेत ठसा उमटवला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर बुधवारपासून ही स्पर्धा सुरू आहे. १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या साहिल लस्करने १ मिनिट ५.९३ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर मुलींच्या गटात कर्नाटकच्या निना व्यंकटेशने १ मिनिट १०.८७ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले तर महाराष्ट्राच्या पलक धामीने (१.११.११) रौप्य पदक मिळवले. २०० मीटर मिडले प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या उत्कर्ष गौरने २ मिनिटे ४२.९१ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णयश मिळविताना शॉन गांगुलीने २०१५ मध्ये नोंदविलेला २.४३.१३ सेकंदांचा विक्रम इतिहासजमा केला. याआधी उत्कर्षने लक्षवेधी कामगिरी करत ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात ३४.३० सेकंद वेळ नोंदवून आपलाच ३४.८८ सेकंदांचा विक्रम मोडून नवा विक्रम नोंदविला. या स्पर्धेत उत्कर्षने ५० मीटर बॅकस्ट्रोक, ५० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर फ्रीस्टाईल, ५० मीटर बटरफ्लाय या प्रकारांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आहे. उत्कर्ष हा पुण्यातील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये पाचवीत शिकत असून हार्मनी क्लब येथे नरेंद्र आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संजिती साहाने ३०.१७ सेकंद वेळ नोंदवत नव्या विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्रच्याच पलक धामीने ३०.६४ सेकंद वेळेसह रौप्यपदक प्राप्त केले. याआधी संजितीने सकाळच्या प्राथमिक फेरीत स्वत:चाच ३१.१७ सेकंदाचा विक्रम मागे टाकला. संजितीचे हे वैयक्तिक गटात पाचवे सुवर्णपदक आहे. तिने या स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाईल आणि ५० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर बटरफ्लाय प्रकारातही विक्रमांसह सुवर्णपदकांचा वेध घेतला आहे. संजिती मुंबई येथे आबाबाई पेटिट स्कूलमध्ये सातवीत शिकत असून खार जिमखाना येथे देवदत्त लेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलांच्या गटात गोव्याच्या शॉन गांगुलीने २८.६१ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात मुलांच्या गटात आसामच्या ख्यातीमान कश्यपने ३९.३० सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले तर मुलींच्या गटात आसामच्याच जान्हवी कश्यपने ४३.११ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या संजना पालाने ४३.४५ सेकंद वेळेसह कांस्यपदक मिळवले.१०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या वेदिका अमिनने १ मिनिट २.७७ सेकंद वेळ नोंदवत २०१० मध्ये कर्नाटकच्या माल्विका व्ही. हिने नोंदविलेला १ मिनिट ३.७० सेकंदाचा विक्रम मागे टाकत सुवर्णयश मिळविले. वेदिकाने या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात एकूण ४ सुवर्णपदके जिंकली आहेत. तिने ५० मीटर ब्रेसस्ट्रोक व ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात, १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक व १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात ४ नव्या विक्रमांची नोंद केली. गतवर्षीदेखील तिने ३ सुवर्णपदके जिंकली होती. मुलांच्या गटात आसामच्या अनुभव पराशरने १ मिनिट १.१४ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.४ बाय ५० मीटर मिडले प्रकारात मुलांच्या गटात दिल्लीच्या संघाना २ मिनिटे २४.३० सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात मुलांच्या गटात आसामच्या संघाने १ मिनिट ५५.७१ सेकंद वेळेसह सुवर्णपदक मिळवले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रँडमास्टर अभिजित कुंटे व राज्याचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते व १९८२च्या दिल्ली आशियायी खेळातील वॉटर पोलो संघातील खेळाडू संजय करंदीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वीमिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी, महाराष्ट्र राज्य हौशी अॅक्वेटिक संघटनेचे सचिव झुबिन अमेरिया, अध्यक्ष अभय दाढे, भारतीय आॅलंपिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष वीरेंद्र नानावटी, ग्लेनमार्क अॅक्वेटिक फाऊंडेशनचे तांत्रिक संचालक पीटर गारट्रेल उपस्थित होते.
महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद
By admin | Published: July 01, 2017 7:56 AM