पुणे - मनसेचे पुण्यातील आमदार रमेश वांजळे हे गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या डॅशिंग स्वभावामुळे आणि भारदस्त पर्सनॅलिटीमुळे ते अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यानंतर, त्यांचे अंगरक्षक उमेश आसवे यांची आर्थिक परिस्थिती ढासाळली आहे. महाराष्ट्राचे खली म्हणून उमेश यांना संबोधले जाते. मात्र, या खलीच्या प्रकृती अस्वस्थतेसाठी आता आर्थिक मदत मागण्यात येत आहे. नगरसेवक वसंत मोरे यांनी फेबुक पोस्ट करुन अनेकांना मदतीचा हात मागितला आहे.
वसंत मोरे हे नाव गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात आणि मीडियात चांगलंच चर्चेत आहे. आपल्या हटके स्टाईल कामाने ते सोशल मीडियावर हिरो ठरले आहेत. आक्रमक पण तितकाच संवेदनशील नेता अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच, आपल्या नेत्याच्या अंगरक्षकावर आलेल्या संकटासाठी ते संकटमोचक म्हणून धावून आले आहेत. रमेश वांजळे यांचे बॉडीगार्ड असलेल्या उमेश यांच्यासाठी त्यांनी आर्थिक मदतीची याचना केली आहे.
अनेकांनी केली ऑनलाईन मदत
तब्बल ७ फूट उंच आणि १६५ किलो वजन असलेले उमेश वसवे महाराष्ट्राचे 'खली' म्हणून प्रसिद्ध होते. धिप्पाड शरीरयष्टी लाभलेले उमेश गेल्या २ वर्षांपासून आजाराशी झगडत आहेत. आता, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने त्यांच्या मदतीसाठी वसंत मोरेंनी थेट सोशल मीडियातून आवाहन केलं आहे. त्यानंतर, दिवंगत आमदार वांजळे यांच्या चाहत्यांकडून वासवे यांना मदत मिळत आहे. अनेकांनी ऑनलाईन आर्थिक मदत केल्याचे स्क्रीनशॉट्सही वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टखाली कमेंट केले आहेत. वसंत मोरेंच्या आवाहनाला सोशल प्रतिसाद मिळत असल्याने वासवे यांना आर्थिक हातभार लाभत आहे.